उन्हाळ्यात पांदन रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:34 AM2021-04-01T04:34:59+5:302021-04-01T04:34:59+5:30
देऊळगाव मही येथे दोन पॉझिटिव्ह देऊळगाव मही : देऊळगाव राजा तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. देऊळगाव मही येथे ...
देऊळगाव मही येथे दोन पॉझिटिव्ह
देऊळगाव मही : देऊळगाव राजा तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. देऊळगाव मही येथे मंगळवारी दोन काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओल्या-सुक्या कचऱ्यापासून गांडूळखत
धाड : दररोजच्या ओल्या आणि सुक्या कचऱ्याची केवळ विल्हेवाट न लावता त्यापासून सेंद्रीय खतांची निर्मिती करण्याचा उपक्रम परिसरातील काही ग्रामपंचायतींनी अवलंबण्यास सुरुवात केली आहे. गाव क्षेत्रात लागवड केलेल्या वृक्षांना व गावातील शेतकऱ्यांना या खताचा लाभ मिळत आहे. ग्रामपंचायतीचा आर्थिक स्त्रोत वाढला आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त
डोणगाव : गत तीन ते चार दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर दिसून येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कुत्रे कोणी व कुठून आणून सोडतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकवेळा बालकांचे घराबाहेर निघणे मुश्कील होते.
अतिक्रमणमुक्तीचा संकल्प कागदावरच
बुलडाणा : पालिकेने शहरात अतिक्रमण हटाओ मोहीम गतवर्षी राबविली होती. बसस्थानक परिसरासह शहरातील ५० ते ६० दुकाने काढण्यात आली होती. पालिकेने अतिक्रमणमुक्तीचा केलेला संकल्प आता कागदावरच राहत असल्याने पुन्हा अतिक्रमण डोकेवर काढत आहे.
बसस्थानकावर आवश्यक सुविधांचा आभाव
बुलडाणा : जिल्ह्यातील काही ठिकाणचे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे, तर अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याची सोय नाही, महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. या सुविधा प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह प्रवाशी करीत आहेत.
मानव विकाससाठी निधीचा अभाव
बुलडाणा : गतवर्षी मानव विकास निर्देशांक वाढविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सात तालुक्यांत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमासाठी जवळपास १७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार होता. मात्र कोरोनामुळे हा निधी मिळण्यासाठी अडचणी वाढल्या आहेत. जिल्ह्यात २०१३ पासून मानव विकास कार्यक्रमाची सात तालुक्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.
स्वयंचलित हवामान केंद्राचा प्रश्न रखडला
लोणार : हवामानातील अनाकलनीय बदलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या लोणार येथील स्वयंचलित हवामान केंद्रासाठीच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. तहसील कार्यालय परिसरातील दहा बाय दहा मीटरची जागा या हवामान केंद्रासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु हवामान केंद्राचा प्रश्न रखडलेला आहे.
शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित
बुलडाणा : महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित राहत आहेत. महाविद्यालयांनी ऑनलाइन अर्ज तपासून प्रस्ताव सादर करावे लागतात. परंतु वेळेवर प्रस्ताव सादर होत नसल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडते.