‘कोरोना’बाबत दक्षता बाळण्याची गरज - हेमराज राजपूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 11:36 AM2020-07-05T11:36:19+5:302020-07-05T11:37:16+5:30
आंतरिक सेवा सुरक्षा पदक प्राप्त अपर पोलिस अधिकारी हेमराजसिंह राजपूत यांच्याशी साधलेला संवाद...
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पोलिस सेवेतील विविध पदक आणि पुरस्कारांनी मनोबल उंचावण्यास मदत होते. ही पदकं आणि पुरस्कार इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. आंतरिक सेवा सुरक्षा पदक प्राप्त अपर पोलिस अधिकारी हेमराजसिंह राजपूत यांच्याशी साधलेला संवाद...
आंतरिक सेवा सुरक्षा पदक कुणाला दिलं जाते ?
नक्षली भागात दोन वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा देणाºया पोलिस कर्मचारी अधिकाºयांना आंतरिक सेवा सुरक्ष पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदा राज्यातील १, १७२ पोलिस अधिकारी आणि कर्मचाºयांना आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचाही समावेश आहे.
आपल्या मते सेवा काळात नक्षली भागातील उपलब्धी काय?
गडचिरोली येथे सेवारत असताना नक्षलवाद्यांनी २५ किलो वजनाचा भुई स्फोट पेरल्याचा शोध लावण्यात आला. तसेच हा स्फोट निकामी करण्यात आला. तर चंद्रपूर येथे असताना एका बड्या नक्षल्यास अटक करण्यात आली. नक्षली संघटनांचा बिमोड करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. तसेच स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्ह्यात ग्राम रक्षक दलाची स्थापना केली. या दलातील सदस्यांना पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फत ६०० सायकलींचे वितरण करण्यात आले.
आपल्या नक्षली भागातील सेवेबाबत काय सांगाल?
राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागाचा नक्षली भागात समावेश होतो. पोलिस विभागात रूजू झाल्यानंतर गडचिरोली येथे पोलिस उपअधिक्षक म्हणून २०१०-१२ सेवा दिली. त्यानंतर चंद्रपूर येथे २०१६ ते मार्च २०१९ या कालावधीत अपर पोलिस अधिक्षक म्हणून चंद्रपूर येथे सेवा दिली. आपण नक्षली भागात सहावर्षांपेक्षा जास्त अधिक काळ सेवा दिली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग कालावधीतील ४ लॉकडाऊनमध्ये आपण स्वयंशिस्त शिकलो. आता अनलॉक कालावधीत त्या शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना संक्रमण रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी नसून कर्तव्य आहे. कुणीही एकटा कोरोनाचा प्रसार थांबवू शकत नाही.
भीती पोलिसांची नाही, कोरोनाची बाळगा ?
कोरोना या विषाणू संसर्गामुळे जगभर हाहाकार माजला आहे. खामगाव आणि परिसरातही कोरोनाचे थैमान वाढत आहे. नागरिकांची बेफिकीर वृत्ती आणि दुर्लक्षामुळे या रोगाचा प्रसार वाढण्यास मदत होत आहे. काही नागरिकांकडून दक्षता पाळली जात आहे. मात्र, काही नागरिक पोलिसांचा धाक म्हणून नियम पाळत आहेत. मात्र, भीती आणि धाक पोलिसांचा नव्हे तर कोरोनाचा बाळगला हवा. तसेच ‘एसएमएस’ या प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. ‘एसएमएस’ मध्ये पहिला एस म्हणजे सोप, एम म्हणजे मास्क आणि तिसरा एस म्हणजे शारिरीक अंतर होय.