सार्थकला हवी कॉक्लीअर इनप्लॉटसाठी मदत
By admin | Published: June 15, 2017 07:28 PM2017-06-15T19:28:26+5:302017-06-15T19:28:26+5:30
जन्मत: ऐकू येत नसल्यामुळे अनेक अडचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : निसर्ग असो, संगित असो किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनातल्या भावना यासारखे भावविश्व अनुभवण्यासाठी प्रथम आपल्याला ऐकू येणे आवश्यक आहे. मात्र जन्मत ऐकू येत नसल्यामुळे या भावविश्वापासून येथील सोळंके ले-आऊटमधील सार्थक डांगे वंचित असून यासाठी कॉक्लीअर इनप्लॉट शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची गरज आहे.
बुलडाण्यातील सोळंके ले-आऊटमधील प्रदीप डांगे व प्रिती डांगे यांचा मुलगा सार्थक डांगे वय ८ हा येथील महात्मा फुले शाळेत दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुळात हुशार असलेल्या सार्थक डांगेला जन्मता ऐकू येत नसल्यामुळे विविध अडचणी येत आहेत. समोरच्या व्यक्तीच्या बोलताना ओठावरील हालचाली किंवा खाणा खुणामुळे त्याला कळेल, समजेल तेवढे तो ज्ञान ग्रहण करीत असतो. मात्र ऐकू येत नसल्यामुळे काही गोष्टीपासून तो अनभिज्ञ असतो. त्यामुळे शाळेत, शिक्षण घेताना तसेच घरी असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत अकोला, औरंगाबाद, पुणे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उपचार व सल्ला घेवून शेवटी पुणे येथील रूबी क्लिनीकने कॉक्लीअर इनप्लॉट शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. यासाठी ८ लाख रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे डांगे कुटुंबिय चिंतेत पडले. सार्थकचे वडील प्रदीप डांगे एक पतसंस्थेत डेली रिकरिंगचे काम करतात. त्यांच्या महिन्याचे मिळकतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुला-मुलीचे शिक्षण पूर्ण होत आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी कोणतीही रक्कम शिल्लक राहत नसल्यामुळे सार्थकच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या रक्कमेसाठी काही दानशूर व्यक्तींनी मतदतीचा हाथ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र सदर रक्कम शस्त्रक्रियेसाठी पुरेशी नसल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत द्यावी, यासाठी प्रदीप डांगे, अजित रेसीडेन्सी, सोळंके ले-आऊट, बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रदिप डांगे यांनी केली आहे.