लोककलेचा वारसा जोपासण्याची गरज- निरंजन भाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 02:55 PM2020-02-01T14:55:57+5:302020-02-01T14:56:14+5:30

लोककलेच्या परंपराचा आपण आदर बाळगला पाहिजे. लोककलेचा समृद्ध वारसा जोपासण्याची गरज आहे,मत  भारुडकार निरंजन भाकरे यांनी व्यक्त केले.

Need to preserve the heritage of folk art - Niranjan Bhakre | लोककलेचा वारसा जोपासण्याची गरज- निरंजन भाकरे

लोककलेचा वारसा जोपासण्याची गरज- निरंजन भाकरे

Next

- सोहम घाडगे

बुलडाणा : लोककलेतून लोकांच्या भाषेत  लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळतो. लोककलेत ७२ बहुरुपींच्या कला आहेत. त्यातील अनेक लोककला आज लोप पावत चालल्या आहेत. लोककलेच्या परंपराचा आपण आदर बाळगला पाहिजे. लोककलेचा समृद्ध वारसा जोपासण्याची गरज आहे,मत  भारुडकार निरंजन भाकरे यांनी व्यक्त केले.

भारुड या क्षेत्राकडे आपण कसे वळले?

वडील जुने नाटकर्मी होते. अनेक नाटकात त्यांनी काम केले. त्यामुळे घरातून कलेचा वारसा मिळाला. लहानपणी मी सुद्धा ग्रामीण भागातील नाटकात छोट्या भूमिका केल्या. कलापथकात हार्मोनिअम वाजविण्याचे काम करायचो. कार्यक्रमानिमित्त ठाणे येथे होतो.  वर्तमानपत्रात अशोक परांजपे यांच्याविषयी वाचून भारावलो. त्यांची भेट घेतली अन आयुष्य बदलले. त्यांनीच लोककलेचा मार्ग दाखविला आणि भारुडाने मला गारुड घातले ते आयुष्यभराठीच.

घरच्यांचा पाठींबा किती आणि कसा मिळतो ?

भारुड लोककलेला मी सर्वस्व जीवन अर्पण केले आहे. भारुडातून समाजप्रबोधनाचा वसा घेतला आहे. भारुड हेच माझ्या रोजगाराचे साधन आहे. माझ्या कामात माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठींबा आहे. पत्नीचा माझ्यावर  अन माझा पत्नीवर विश्वास आहे. प्रत्येक संकटात ती माझ्या सोबत असते. संघर्षात तिने मला खंबीर साथ  दिली आहे. मुलगा शेखर सावलीसारखा माझ्यासोबत उभा असतो. तो अत्यंत आज्ञाधारक आणि मेहनती आहे. भारुडाच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? भारुड आज सातासमुद्रापार पोहोचले आहे. अमेरिका, मलेशिया, थायलंडमध्ये माझे कार्यक्रम झाले. गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये माझी नोंद झाली. मात्र भारुडाचा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती हालाखिची होती. संकटांशी संघर्ष करीत लोककलेची उपासना केली त्याला आज यशाची फळे लागली.

नवोदित कलाकारांना काय संदेश द्याल?

कलाकार तरुणपणी घराबाहेर अन म्हातारपणी घरात असतो. तारुण्यात पैसा, ग्लॅमर, प्रसिद्धी, नाव याच्या मागे बेधुंद धावत असतो. मात्र त्याचवेळी आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जीवन हे अमूल्य आहे. कधी काय होईल, सांगता येत नाही. त्यामुळे आपले आरोग्य जपा.  माणूस सर्व सोंगे घेऊ शकतो. परंतू पैशाचे सोंग घेता येत नाही. त्यामुळे कमावलेला पैसा बचत करुन ठेवा. चंगळवादाच्या नादात पैसा खर्च करु नका. म्हातारपणी तुमचाच पैसा तुमच्या कामी येईल. आज अनेक कलाकार पैसा नसल्यामुळे वैद्यकिय  खर्च करु शकत नाही. आपल्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी नवोदितांनी आतापासून याची काळजी घ्यावी. माझे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पुढे परिस्थितीमुळे शिकता आले नाही. कुटूंबियांचे व माझे पोट भरण्यासाठी रोजगार शोधणे आवश्यक होते. खासगी कंपनीत कामे केली. मात्र जम बसला नाही. कुठेच मन रमले नाही. लोककलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. आज भारुड हाच माझा श्वास आहे.

Web Title: Need to preserve the heritage of folk art - Niranjan Bhakre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.