शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहाराची गरज - डॉ. साधना पाचरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 02:49 PM2020-02-01T14:49:27+5:302020-02-01T14:49:51+5:30
अमरावती येथील ‘विना तेलाची भाजीची भीसी’ संकल्पनेच्या प्रणेत्या तथा आहारतज्ज्ञ डॉ. साधनाताई पाचरणे यांच्याशी साधलेला संवाद...
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : चुकीच्या आहारामुळेच प्रकृतीत विकृती निर्माण होते. शरीरात विविध आजाराची वाढ होते. निरोगी रहायचे असेल तर प्रत्येकाने नैसर्गिक आणि संतुलित आहार सेवन करणे गरजेचे आहे . अमरावती येथील ‘विना तेलाची भाजीची भीसी’ संकल्पनेच्या प्रणेत्या तथा आहारतज्ज्ञ डॉ. साधनाताई पाचरणे यांच्याशी साधलेला संवाद...
विना तेलाच्या भाज्यांच्या प्रशिक्षणाची संकल्पना कशी सुचली?
विना आणि कमी तेल्याच्या भाज्या तयार करण्याचे अमरावती येथे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कमी तेलाच्या भाज्या खाण्यास स्वत:पासून सुरूवात केली. पुढे घरातील मंडळी, नातेवाईक आणि मैत्रिणींना ही संकल्पना सांगितली. अनेकांना लाभ मिळाल्याचा अनुभव आल्याने विनातेलाच्या प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केल्यात.
‘विना तेलाच्या भाजीची भीसी’ म्हणजे काय?
प्रशिक्षण आणि कार्यशाळांना वेगळे आणि नाविण्यपूर्ण स्वरूप देण्यासाठी परिसरातील महिला आणि मैत्रिणींच्या सहभागातून ‘विना तेलाची भाजी तयार करण्याची भीसी’ सुरू केली. आठवड्यातून एकदा समुहात सहभागी सदस्यांकडून विना तेलाची भाजी करून घेण्यात आली. या संकल्पनेला आता व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे.
विना तेलाच्या भाज्यांच्या सेवनाचे काही फायदे?
निश्चितच, आपल्यासाठी समतोल, पोषक, सात्विक आहार हेच उत्तम औषध आहे. कमी आणि विना तेलाच्या भाज्यांमुळे वजन कमी होण्यासोबतच, अपचन आणि अॅसिडीटी यासारख्या विकारात हमखास लाभ मिळतो.
भाज्या तयार करण्याच्या कार्यशाळा कुठे आयोजित केल्यात.?
अमरावती येथून नि:शुल्क कार्यशाळांना सुरूवात केली. अमरावती नंतर बुलडाणा, अकोला, पुणे, औरंगाबाद, वाशिम, अहमद नगर, जळगाव खांदेश आणि मुंबई सारख्या शहरात नि:शुल्क कार्यशाळांचे आयोजन केले जाते.
तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण या तिन्ही धातंूचे समप्रमाण माणसाला निरोगी जीवन देतात. आजारी पडून औषध घेण्यापेक्षा आजार होऊच नये, याची प्रत्येकाने काळजी घेणे अधिक शहाणपणाच ठरते. नैसर्गिक आहार हेच मनुष्यासाठी जीवनदायी अन्न आहे.
विना तेलाच्या भाज्या तयार करण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले?
योग्य आहाराचा मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. याउलट आहार बिघडल्यास त्याचे परिणाम आरोग्यावर आणि प्रकृतीवर दिसू लागतात. म्हणजेच आरोग्य आणि आहाराचा जवळचा संबध आहे. आहाराविषयक काहीतरी वेगळं करण्याची जिज्ञासा गत अनेक दिवसांपासून मनात होती. त्यामुळे याविषयी कुठे कार्यशाळा होतात का? याची माहिती घेतली. त्यानंतर अमरावती येथील प्रयास-सेंवाकूर संस्थेचे निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. जीवनलाल गांधी आणि डॉ. अविनाश सावजी यांच्या विविध कार्यशाळांमध्ये विनातेलाच्या भाज्यांचे प्रशिक्षण घेतले.