कौशल्याधारित शिक्षणपध्दती काळाची गरज! - डॉ. सुगन बरंठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 04:08 PM2020-02-08T16:08:19+5:302020-02-08T16:08:42+5:30
अखिल भारतीय नयी तालिम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांच्याशी साधलेला संवाद...
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा असावे. हे शिक्षण उत्पादक, श्रम आणि हस्तकौशल्याधारित दिले जावे जेणेकरून त्या विद्यार्थ्याच्या मूळ व्यवसायाला बाधा येणार नाही. महात्मा गांधींच्या विचारांचा भारत घडविण्यासाठी देशाला ‘नई तालीम’ ही काळाची गरज आहे. अखिल भारतीय नयी तालिम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांच्याशी साधलेला संवाद...
‘नई तालीम’च्या संकल्पनेबद्दल काय सांगाल ?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सन १९३७ साली सर्वात पहिल्यांदा ‘नई तालीम’ हा शिक्षण विषयक विचार मांडला. प्राथमिक शिक्षणात आरोग्य आणि आहार शास्त्राचा समावेश असावा. शाळेत सर्व विषय शिकवताना ते विषय विविध कौशल्याधारित असावे, हीच ‘नई तालीम’ची मुख्य संकल्पना आहे.
सर्वोदयी विचारांशी आपण कसे जुळलात ?
जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीचा परिचय झाल्यानंतर त्यांनी सुचविलेले विचार आणि संकल्प प्रत्यक्षात आणायचे ठरविले. कालांतराने नर्मदा बचाव आंदोलनात सहभागी झालो. आयुष्य सर्वोदयी विचारांचे वाहून घेण्याचे ठरविले. त्यानंतर गांधीवादी संस्थांशी संपर्क झाला. सुरूवातील महाराष्ट्र सर्वोदय मंडळ आणि नंतर अखिल भारतीय सर्वोदय मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. आता ‘नई तालीम’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे.
‘नई तालीम’अंतर्गत नवीन उपक्रम काय ?
चंपारण्याशी महात्मा गांधींचा अनुबंध होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चंपारण्यात ‘भीती हरवा’चे शिक्षण दिले होते. त्याच धर्तीवर चंपारण्यातील काही जणांना सेवाग्राम येथे ‘भीती हरवा’चे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाला सरकारचे सहकार्य आहे. याशिवाय ‘नई तालीम’तंर्गत देशातील विविध संस्थाचे प्रशिक्षण आणि कौशल्याधारीत ज्ञानदानाचे कार्य ‘सेवाग्राम’ येथे चालते.
अहिंसक, न्यायपूर्ण, सहकायार्धारित समाज-संस्कृतीची निर्मिती व्हावी या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारातून सेवाग्राम येथे ‘नई तालीम’ या अभिनव शिक्षणपद्धतीची सुरुवात झाली. महात्मा गांधींच्या विचारांचीही शिक्षण पध्दती देशाला नवीन शिक्षण प्रणालीचे धडे देत आहे.
देशात ‘नई तालीम’चे कार्य कोठे चालते ?
भारताच्या अंहिसक स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार सेवाग्राम राहीला आहे. ‘सेवाग्राम’ने संपूर्ण जगाला अनेकविध संकल्पना दिल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘नई तालीम’ ही अभिनव शिक्षणप्रणाली असून ‘सेवाग्राम’मध्येच या संकल्पनेची सन २००५ मध्ये सुरूवात झाली. सद्यस्थितीत देशातील गुजरात, बंगाल, बिहार, ओरीसा, महाराष्ट्र यासारख्या राज्यात ‘नई तालीम’चे आंशिक कार्य सुरू आहे. गुजरातमध्ये २९४, बिहारमध्ये ४३१ केंद्र नई तालीमचे आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आनंद निकेतन, सृजन आनंद येथेही ‘नई तालीम’ कार्यरत आहे.