जलक्रांतीसाठी लोकचळवळ उभी राहणे गरजेचे - आमिर खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:54 AM2018-04-24T01:54:41+5:302018-04-24T01:54:41+5:30
खामगाव : जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या गावांची अपेक्षित दखल पाणी फाउंडेशनच्यावतीने घेण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; मात्र असे असले तरी, जलसंधारण आणि पाणलोट ही एक लोकचळवळ होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सुप्रसिद्ध सिने अभिनेते तथा पाणी फाउंडेशनचे प्रणेते आमिर खान यांनी येथे व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

संग्रामपूर तालुक्यातील सालवन येथील जलसंधारणाच्या कामाची पाहणी आणि श्रमदान करून परतत असताना त्यांनी उपस्थित काही मोजक्या पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने गेल्या तीन-चार वर्षांपासून जलसंधारण, पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. शासनाच्या आणि पाणी फाउंडेशनच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्र राज्यातील अनेक खेडे आणि त्या खेडे गावातील नागरिक समोर येत आहेत; मात्र राज्याची लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास ही संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामात मोठय़ा संख्येने नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. खरं तर हे एक दैवी कार्य म्हणून महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाने पाण्याचा थेंब न थेंब वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, एखाद्या गावात जाऊन श्रमदान करावे, एवढीच आपली प्रामाणिक इच्छा आहे. तथापि, दिवसेंदिवस नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद वाढत असून, सन २0१८ च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत चार हजारापेक्षा जास्त गावे सहभागी झाली आहेत. पुढील वर्षी या संख्येत निश्चित भर पडेल, ही एक शुभ संकेतांची नांदी आहे, असेही आमिर खान म्हणाले. पाण्याच्या कामासाठी आपण सालवन येथे आलो असून, राज्यातील ६0-७0 गावांमध्ये आपण दौरा केल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.