एनडीडीबी प्रकल्पावर जोर देण्याची गरज; पहिल्या टप्प्यात जागृतीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:42 PM2018-05-10T18:42:19+5:302018-05-10T18:42:19+5:30
बुलडाणा : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) व मदर डेअरी फ्रुटस अॅन्ड वेजीटेबल लिमिटेडच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुग्धोत्पादन वाढीसाठी ३५२ गावांची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात प्रकल्पाची सुरूवात झाली आहे.
बुलडाणा : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) व मदर डेअरी फ्रुटस अॅन्ड वेजीटेबल लिमिटेडच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुग्धोत्पादन वाढीसाठी ३५२ गावांची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात प्रकल्पाची सुरूवात झाली आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्हा या प्रकल्पात मागे पडलेला आहे. त्यामुळे प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिक जोर देण्याची गरज आहे. दुधातील फॅट्स आणि एसएनएफचे प्रमाण योग्य राखण्यासाठी अर्थात दुधाची गुणवत्ता जपण्यासाठी उपरोक्त गाातील साडेतीन हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पशु संवर्धन विभागातील सात डॉक्टरांना गुजरातमधील आनंद प्रकल्पावर प्रशिक्षण देण्यात आले असून हे डॉक्टर आता जिल्ह्यातील सहा तालुक्यातील साडेतीन हजार नागरिकांना प्रशक्षण देणार आहेत. प्रत्येक गावातील किमान २० नागरिकांना यासंदर्भात प्रशिक्षण देऊन दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी जागृत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अगदी प्राथमिकस्तरावर गुरांची स्वच्छता व निगा राखण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून गोडीच निर्मूलनासाठी एनडीडीबी प्रकल्पातंर्गत तब्बल ५० शिबीरे घेण्यात आली आहे. यामध्ये गायींचे वंध्यत्व दूर करण्यासोबतच कृत्रिम रेतन, गुरांचे खच्चीकरण करण्यासंदर्भात यामध्ये प्रशिक्षण तर्था मार्गदर्शन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील ६२, बुलडाणा तालुक्यातील ६५, खामगाव तालुक्यातील ७०, शेगाव तालक्यातील १५, मेहकर तालुक्यातील ५४ आणि मोताळा तालुक्यातील ८५ गावांची निवड करण्यात आली आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पा या गावात सुरू करण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न होण्याची गरज आहे. प्रकल्प संचालकांचा वॉच जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रकल्प संचालकांनी प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले असून चार मे रोजी व्यक्तिश: प्रकल्प संचालकांनी बुलडाणा येथे अधिकार्यांची व कर्मचार्यांची भेट घेऊन प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करण्यावर भर दिला आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचार्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले आहे. गुरांची काळजी घेण्याबाबतही त्यात बजावण्यात आले. गायवर्गीय पशुंच्या दुधातील फॅट्स ३.५ आणि एसएनएफ ८.५ ठेवण्यावर भर देण्यात आला असून त्या दृष्टीन पशुंची कशी निगा राखावी याचे मार्गदर्शनही प्रकल्प संचालकांनी या सर्व पृष्ठभूमीवर केले आहे.
वैरण विकास कार्यक्रमावर भर
उन्हाळ््यामध्ये दुग्धोत्पाद कमी होत असल्याच्या पृष्ठभूमीवर गुरांना चांगला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी वैरण विकास कार्यक्रमावर भर देण्यात आला असून त्यासाठी प्रकल्पातंर्गत ६१ लाख २० हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या प्रशिक्षणावरच सुमारे नऊ लाख रुपयांचा खर्च होत असून वंधत्व निवारण शिबीरासाठी दहा हजार रुपये तर गोचीड निर्मूलनासाठी १३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करू देण्यात देण्यात आला आहे. मदर डेअरी प्रकल्पातंर्गत सध्या मलकापूर, नांदुरा, खामगाव आणि काही प्रमाणात मोताळा तालुकयात उपक्रम सुरू करण्यात आला असून ७२ गावात सध्या १२ हजार ५०० लिटर दुध संकलनाचेही काम सुरू झाल ेआहे.