जलसंवर्धनाची चळवळ गावागावात पोहचणे गरजेचे - संजय गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 07:39 PM2019-05-25T19:39:30+5:302019-05-25T19:39:40+5:30
जलसंवर्धनाची चळवळ गावागावात पोहचणे गरजेचे आहे. कारण काहीही अशक्य नाही हे सिंदखेड (प्रजा) वासियांनी सिध्द केले.
- नवीन मोदे
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील जनुना हे अवघे ३५६ लोकवस्तीचे गाव. कायम दुष्काळी पट्टा, गाव पाणीदार करण्यासाठी गावातील चार मित्र टेलर, गवंडी, पेंटर व विद्यार्थी दुष्काळाशी एकाकी लढा देत आहे. पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत मागील दीड महिन्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत श्रमदानाचे टार्गेट पुर्ण केले आहे. त्यामध्ये शामराव कळमकर व्यवसायाने गवंडी, शिवाजी मानकर व्यवसायाने टेलर, संजय गायकवाड व्यवसायाने पेंटर व योगेश मानकर या चौघांच्या सांघिक प्रयत्नाबाबत संजय गायकवाड यांच्याशी झालेला संवाद.
पाणीप्रश्नी चौघे एकत्र कसे आले?
मागील ५ ते ६ वर्षापासून गावातील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. टँकर भरण्यासाठीसुध्दा परिसरात पाणी नाही. त्यामुळे पाणी समस्येवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची गरज चर्चेतून पुढे आली व कामाला लागलो.
प्रेरणा कोठून मिळाली?
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत मोताळा तालुक्यात मोठे काम श्रमदानातून झाले. सिंदखेड गावाने संघर्ष व श्रमदानाच्या जोरावर राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकापर्यंत मजल मारली व गाव पाणीदार झाले. त्यांना शक्य आहे तर आपणहीकरू शकतो याची प्रेरणा मिळाली व फाऊंडेशननेही प्रतोत्साहन दिले.
अपयशाची भीती वाटत होती का?
काम करित असताना परिणामाची चिंता करायची नाही, हे ठरविले होते. त्यामुळे अपयशाची भीती मनात नाही. गमविण्यासारखे आमचेकडे काहीच नाही.
आपल्या या प्रयत्नामुळे गाव पाणीदार होईल का?
गाव एकदम पाणीदार होईल, असे आम्ही म्हणणार नाही; परंतु निश्चित फरक पडेल व ते बघून पुढील वर्षी गावकरी या चळवळीत सहभागी होतील.
पॅकेजबाबत काय मत आहे. आजपर्यंत किती काम झाले?
गावच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला मिळालेले टार्गेट श्रमदानाचे व मशिनव्दारे दोन्ही आम्ही पुर्ण केले व स्पर्धेची तालुकास्तरीय फेरी गाठली आहे. व्यवसायाने पेंटर, गवंडी, टेलर आणि एक विद्यार्थी असलेल्या या चौघा मित्रांनी प्रारंभी आपला व्यवसाय व शिक्षणासाठी वेळ काढून श्रमदानाचे काम सुरू ठेवले होते. परंतु मागील १५ दिवसांपासून फक्त श्रमदान व इतर नियोजनात वेळ कमी पडतोय. मात्र आमच्या एकाकी लढ्याची समाजानेही दखल घेण्यास प्रारंभ केला आहे. ‘लोकमत’ लोकांसमोर आमचा संघर्ष आणला. तो अनेकांना माहिती झाला. त्यानंतर अनेकांनी आमची भेट घेऊन सहकार्य करण्याची भूमिका दाखवली. आम्हाला आर्थिक पाटबळही त्यामुळे मिळण्यास प्रारंभ झाल्याचे संजय गायकवाड यांनी संवाद साधताना आवर्जून सांगितले.