नीरीच्या संशोधकांनी घेतले लोणार सरोवरातील सहा ठिकाणचे पाण्याचे नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:58 AM2020-06-16T10:58:20+5:302020-06-16T10:59:35+5:30
अध्ययनानंतर आठवडाभरात पाण्याचा रंग बदलण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.
बुलडाणा: लोणार सरोवरातील पाण्याचा लालसर गुलाबी रंग होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सरोवरातील सहा ठिकाणचे नमुने निरीच्या संशोधकांनी गोळा केले असून सविस्तर अध्ययनानंतर आठवडाभरात पाण्याचा रंग बदलण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे निरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अतुल मालधुरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, १५ जून रोजी सरोवराच्या चारही बाजूकडील आणि सरोवराच्या मध्य भागातील दोन फुट खोल पाण्यातील नमुनेही या संशोधकांनी घेतले आहे. नीरीचे एक पथक १५ जून रोजी दुपारी दीड वाजता येथे पोहोचले. यामध्ये मुख्य संशोधक डॉ. गजानन खडसे, वरिष्ठ संशोधक अतूल मालधुरे आणि सहकारी महेश कुमार यांचा समावेश होता. वन्यजीव विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी एस. बी. नप्ते, वनरक्षक डी. एल. शिंदे, एच. जे. माने, जी. आर. शिंदे, के. बी. सरकटे आणि के. ई. नागरे यांनी त्यांना लोणार सरोवराचा परिसर दाखवला. आल्या आल्या या शास्त्रज्ञांनी थेट सरोवरात उतरणे पसंत केले. दरम्यान, ‘येथे येण्यापूूर्वी पाणी लालसर गुलाबी झाले होते. मात्र त्याती घनता तुलनेने कमी होती’, असे आपल्याला सांगण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वीही बॅक्टेरिया आणि अलगीमुळे (शैवाल) पाण्याचा रंग बदलल्याची काही उदाहरणे आहेत. प्रामुख्याने मे १५ ते जून १५ या कालावधीत तापमान आपल्याकडे वाढलेले असते. या कालावधीत अलगी वाढण्याचे प्रमाण अधिक असते. त्यातून काही बॅक्टेरियाही जनरेट होतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. पण, लोणार सरोवरातील पाण्याची फिजीओ केमिकल प्रॉपर्टी ही अन्य सरोवरांच्या तुलनेत वेगळी आहे. साधारणत: समुद्राच्या पाण्याप्रमाणेच लोणार सरोवरातील क्षारतेचे प्रमाण आहे. त्यामुळे येथील मायक्रो बायोलॉजिकल अॅक्टीव्हीटी वेगळी आहे. वाढत्या तापमानामुळे येथे बॅक्टेरिया, अलगी अधिक वाढली असावी आणि त्यातून पिगमिटेशन (रंगद्रव्याचा थर) झाले असावे, असा अंदाज, अतुल मालधुरे यांनी व्यक्त केला. मात्र प्रत्यक्षात सविस्तर अध्ययनानंतरच याबाबत अधिक स्पष्टपणे बोलणे योग्य राहील, असे ते म्हणाले. लोणार सरोवराचे नऊ जून रोजी पाणी लालसर गुलाबी झाल्याचे समोर आले होते. त्यासंदर्भात विविध अंदाज व्यक्त केले जात होते. या प्रश्नी प्रशासकीय पातळीवरही यंत्रणेने त्वरित हालचाल करून निरी अर्थात नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या पथकाला लोणार सरोवर येथे पाचारण करण्यात आले होते. लोणार येथेच हे तीन सदस्यीय पथक १५ जून रोजी मुक्काम करत आहे. त्यामुळे प्रसंगी मंगळवारी सकाळी ते पुन्हा सरोवराची पाहणी करू शकतात, असा कयास व्यक्त केल्या जात आहे.