खामगाव पालिकेचे दुर्लक्ष; कचरा विलगीकरणाला ‘खो’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:52 AM2017-12-05T00:52:51+5:302017-12-05T00:54:07+5:30
कचरा उचल करणार्या संबंधित कंत्राटदाराकडून नियम व शर्तीचा भंग करण्यात येत असून, कचरा उचलताना कचर्याच्या विलगीकरणास ‘खो’ दिल्या जात असून, संपूर्णपणे कचर्याची विल्हेवाट लावल्या जात नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच कचरा उचल प्रक्रियेस गती देण्यासाठी शहरात घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याची व्यवस्था पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे; मात्र कचरा उचल करणार्या संबंधित कंत्राटदाराकडून नियम व शर्तीचा भंग करण्यात येत असून, कचरा उचलताना कचर्याच्या विलगीकरणास ‘खो’ दिल्या जात असून, संपूर्णपणे कचर्याची विल्हेवाट लावल्या जात नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ शहराच्या शहरांमध्ये खामगाव पालिकेने सहभाग नोंदविला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी, यामध्ये अनेक उणिवा असल्याचे समोर येत आहे. शहरातील विविध प्रभागातील कचरा डंपिंग हाउसवर नेवून टाकण्यासाठी अमरावती येथील एका संस्थेस कंत्राट देण्यात आला आहे. यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून १६ घंटागाडीद्वारे नागरिकांच्या घरोघरी जात कचरा गोळा केल्या जातो. नागरिकांच्या घरून कचरा गोळा करताना या कचर्याचे जागीच ओला-सुका-घरगुती आणि घा तक कचरा असे विलगीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी कचरा उचल करणार्या घंटागाडीमध्ये ओला आणि सुका कचर्यासाठी वेगळी व्यवस्था असणे गरजेचे आहे; मात्र शहरा तील कचरा गोळा करताना एकाच घंटागाडीत कोणतीही वेगळी व्यवस्था न करता सरसकटपणे कचरा गोळा केल्या जात आहे. त्याचप्रमाणे गोळा झालेला कचरा न झाकता डंपिंग ग्राउंडवर नेल्या जात असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार बिनबोभाट पद्धतीने सुरू आहे; मात्र याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
असे करण्यात आले स्टिंग ऑपरेशन!
- ‘लोकमत’ चमूने शहरातील विविध प्रभागात फिरून घंटागाड्यांची पाहणी केली. या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही भागात घंटागाडी दिलेल्या वेळेत फिरकलीच नाही.
- या चमूने वेगवेगळ्या वेळेत शहराच्या विविध भागात जावून पाहणी केली. गेल्या आठवड्यात सोमवार ते शनिवार या सात दिवसांच्या कालावधीत करण्यात आलेल्या या पाहणीत कचरा उचलणार्या एकाही घंटागाडीमध्ये कचरा विलगीकरणाची व्यवस्था आढळून आली नाही.
- कचरा विलगीकरणासाठी अवस्थेसोबतच शहरातील काही भागात कचरा गाडी फिरकल्याच नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’चमूला आढळून आले.
आठ दिवस घंटागाडी फिरकलीच नाही
शहरातील कचरा उचलण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटदाराचा आर्थिक कारणावरून नेहमीच वाद उद्भवतात. परिणामी, शहरातील कचरा गोळा करण्याच्या प्रक्रियेत खोळंबा निर्माण होत असल्याचे दिसून येते. गेल्या महिन्यात या कंत्राटदाराने शहराच्या विविध भागातील चक्क चार घंटागाडी बंद केल्या. त्यामुळे काही प्रभागात तब्बल आठ दिवसांपर्यंत घंटागाडी फिरकल्याच नाहीत. त्यामुळे शहराच्या अनेक भागात कचरा रस्त्यावर साचला होता. त्याचप्रमाणे मुख्य चौक तसेच बाजार पेठेतील कचराकुंडी ओव्हरफ्लोदेखील झाल्या होत्या.
गोळा केलेला एकत्रित कचरा थेट डंपिंग ग्राउंडवर!
शहराच्या विविध भागातील कचर्याचे घंटागाडीत विलगीकरण करण्याची व्यवस्था नाही. दरम्यान, घंटागाडीत एकत्रित केलेला कचरा थेट शहराबाहेरील डंपिंग ग्राउंडवर फेकण्यात येत आहे. इतर नगरपालिकांच्या तुलनेत डंपिंग ग्राउंडवरदेखील कचरा विलगीकरण केल्या जात नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
शहराच्या विविध प्रभागातील कचरा उचलण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. यासाठी कंत्राटदाराने घंटागाडी सुरू केल्या आहेत. कंत्राटदार आणि घंटागाडी चालकांमधील वादाशी पालिकेचा संबंध नाही. तथापि, कचरा विलगीकरणाची माहिती घेतली जाईल. त्यानंतर संबंधि तांवर कारवाईही केली जाईल.
- अनिता डवरे, नगराध्यक्ष, खामगाव.
सुरुवातीला काही दिवस घंटागाडी आली. आता तरी कचर्याची समस्या सुटेल, असे वाटले होते. शहरातील साफसफाईचा बोजवारा उडाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून घंटागाडीही बंद होती. घंटागाडीवाले नियमित येत नाहीत. तसेच रस्त्यांचीही स्वच्छता केली जात नाही. पालिका पदाधिकारी कुणाचेही ऐकून घेत नाहीत.
- वर्षा पाटील, शंकर नगर, खामगाव.