ना पीकविमा काढण्याचे पैसे, ना अर्ज भरण्याची चिंता, देऊळगाव राजाच्या बाजार समितीचा उपक्रम
By ब्रह्मानंद जाधव | Published: July 9, 2023 05:38 PM2023-07-09T17:38:22+5:302023-07-09T17:38:33+5:30
सध्या पेरणी सुरू असून शेतकरी बांधवांची पेरणीनंतर पीक विम्याची लगबग सुरू होत आहे.
देऊळगाव राजा : पीकविमा एक रुपयात करूनही अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची लूट सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने विनामूल्य पीकविमा काढण्याची सुविधा सुरू केली आहे. देऊळगाव राजाच्या बाजार समितीच्या या विशेष उपक्रमामुळे येथील शेतकऱ्यांना आता ना पीकविमा काढण्याचे पैसे, ना अर्ज भरण्याची चिंता राहिली आहे.
सध्या पेरणी सुरू असून शेतकरी बांधवांची पेरणीनंतर पीक विम्याची लगबग सुरू होत आहे. शासनाने १ रुपयात शेतकऱ्यांचा विमा काढण्याचे ठरविले आहे. पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने पीकविमा भरणा करावा लागतो. त्यामुळे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बाजार समिती सभापती समाधान शिंगणे यांना बाजार समितीतच पीकविमा भरण्याची प्रक्रिया राबवावी,अशी सूचना केली आहे. त्यानुसार बाजार समितीने शेतकऱ्यांचा पीकविमा काढण्यासाठी समिती संचालक मंडळाचे सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेतला आहे. शेतकऱ्यांना जो पीकविमा भरण्यासाठी एक रुपया द्यावा लागणार आहे, तो एक रुपया सुद्धा बाजार समिती भरणा करणार आहे. तसेच फॉर्म सुद्धा बाजार समिती विनामूल्य भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा विनामूल्य भरता येईल,अशी सोय बाजार समितीने केलेली आहे.
संचालक मंडळाचे सभेमध्ये सभापती समाधान शिंगणे व उपसभापती दादाराव खार्डे यांनी व सर्व संचालक मंडळाने सभेमध्ये चर्चा करून देऊळगाव राजा येथे समिती कार्यालयात एक केंद्र व देऊळगाव मही येथे छत्रपती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये एक केंद्र सुरू करण्याचे ठरविले आहे. बाजार समितीचे कार्यालयात व देऊळगाव मही येथे छत्रपती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये १० जुलैपासून पीकविमा भरणा करणे सुरू झाले आहे. या योजनेचा समितीचे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन समितीचे सभापती समाधान शिंगणे यांनी केले आहे.