दिव्यांग, निराधार योजनेच्या पैशासाठी भाच्याने केला आत्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 05:52 PM2019-06-11T17:52:09+5:302019-06-11T18:02:06+5:30
मोताळा : दिव्यांग आणि निराधार योजनेच्या पैशासाठी भाच्याने चक्क आत्याचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना तालुक्यातील तालखेड येथे सोमवारी रात्री १२ वाजेदरम्यान घडली.
मोताळा : दिव्यांग आणि निराधार योजनेच्या पैशासाठी भाच्याने चक्क आत्याचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना तालुक्यातील तालखेड येथे सोमवारी रात्री १२ वाजेदरम्यान घडली. या हत्याकांडात आरोपी भाच्याला त्याच्या एका मित्राने मदत केली असून दोघांनाही बोराखेडी पोलिसांनी सोमवारी अटक केली.
तालुक्यातील तालखेड येथील प्रभाकर निनू चोपडे (६०) यांची बहीण नलुबाई निना चोपडे (६५) या भाऊ बाळकृष्ण निनू चोपडे यांच्या घरात राहत होत्या. बाळकृष्ण चोपडे यांचे निधन झाल्यानंतर नलुबाई त्यांचा भाचा राहुल बाळकृष्ण चोपडे यांच्यासोबत राहायला लागल्या. नलुबाई चोपडे जन्मापासून उजव्या पायाने दिव्यांग असून, त्यांना शासनाकडून दिव्यांग व निराधार योजनेतून दरमहा अनुदान मिळत होते. भाचा राहुल नेहमी आत्या नलुबाई यांना योजनेचे पैसे मागत होता. या कारणावरून राहुल व नलुबाई यांच्यात नेहमी वाद होत होता. या वादाच्या कारणावरून सोमवार, १० जूनच्या रात्री साडे अकरा ते बारा वाजताच्या सुमारास भाचा राहुलने आत्या नलुबाई यांच्या कपाळावर व उजव्या कानावर कुºहाडीने वार करून तिचा खून केला. नलुबाईला ठार मारण्यात राहुल चोपडे याला त्याचा मित्र पवन हरी चौधरी (२०, रा. तालखेड) याने मदत केली, असे तक्रारीत नमूद आहे. तालखेड येथील प्रभाकर निनू चोपडे (६०) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच बोराखेडीचे पीएसआय प्रल्हाद मदन, एएसआय विनोद शिंदे, पोलीस हेड काँस्टेबल राजेश वानखेडे, पोलीस काँस्टेबल संजय गोरे, सुनील भवटे, मोरे, चालक शेख मुस्तकीम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. दरम्यान, पीएसआय मदन यांनी आरोपींचा शोध घेऊन काही तासातच दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. (तालुका प्रतिनिधी)
आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी
याप्रकरणी प्रभाकर निनू चोपडे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी राहुल बाळकृष्ण चोपडे व पवन हरी चौधरी या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना १३ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.