नेताजींनी देशभक्तीची चेतना विदेशातही जागवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:49+5:302021-01-25T04:34:49+5:30
बुलडाणा : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जिकिरीचा लढा दिला. आपल्या देशाबद्दल प्रेम, आदर प्रत्येकाला असावा, ...
बुलडाणा : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जिकिरीचा लढा दिला. आपल्या देशाबद्दल प्रेम, आदर प्रत्येकाला असावा, याविषयी त्यांनी युवकांमध्ये प्रेरणा जागवली. भारताबद्दल आपल्या देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी देशप्रेमाचे गोडवे गात तेथील नागरिकांवर प्रभाव टाकला. भारताच्या देशभक्तीची चेतना विदेशातही जागविण्याचे काम नेताजींनी केले. राष्ट्रभक्ती कशी असावी, याचे सुंदर उदाहरण सुभाषबाबूंनी दिले आहे, असे प्रतिपादन कादंबरीकार विश्वास पाटील यांनी केले.
कविवर्य भगवान ठग साहित्य नगरी, बुलडाणा (गर्दे वाचनालय सभागृह) येथे देशातील पहिले नेताजी जागर साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बाेलत हाेते. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, स्वागताध्यक्ष बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, बारोमासकार प्रा. सदानंद देशमुख, जयश्री शेळके, विजय अंभोरे, जयसिंगराजे देशमुख, सुरेश साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सकाळी ८ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संगम चौक) येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली.
विश्वास पाटील पुढे म्हणाले, नेताजींच्या कार्यावर अभ्यास करताना अनेक देशात फिरलाे असता अवाक् झालो. जपानमध्ये फिरताना पुरुष येथे आहेत की नाही असे वाटते. एवढ्या प्रचंड प्रमाणात महिला अग्रभागी आहेत. नेताजी तेथे असताना एकही महिला घराबाहेर पडत नव्हती. महिलांना प्रोत्साहित करून त्यांनी एवढे परिवर्तन घडवून आणले की आज महिलाच कारभारी आहेत. सिंगापूरमध्येही त्यांनी क्रांती घडविली. झाशी राणी ब्रिगेड त्यांनी स्थापन केले. महिलांच्या हाती बंदूक देणारे नेताजी पहिले क्रांतिकारी आहेत. महिलांच्या कवायतीही त्यांनीच घडविल्या. महात्मा गांधी आणि नेताजी यांच्यात बेबनाव झाला होता. त्रिपुरा काँग्रेसमध्ये गांधीजींनी सांगूनही नेताजी भरघोस मतांनी निवडून आले. गांधींनीच सुभाषचंद्र बोस यांना पदावरून हटविण्याचा ठराव घेतला होता. नेताजींना नवी क्रांती करायची होती. मात्र, त्यांच्या सेनेतील सैनिकांना गांधींनी स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जाही दिला नाही. ही चूक पुढे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना लक्षात आली, तेव्हा त्या सैनिकांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता देण्यात आली, असेही विश्वास पाटील यांनी सांगितले.