नवे खातेदार शेतकरी पीक कर्जापासून वंचित
By admin | Published: May 22, 2017 12:41 AM2017-05-22T00:41:37+5:302017-05-22T00:41:37+5:30
नाबार्डने मदत नाकारल्याने जिल्हा बँकेचा निर्णय
विवेक चांदूरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नाबार्ड व राज्य शासनाने निधी देण्यास नकार दिल्यामुळे बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने नवीन खातेदारांना पीक कर्ज न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवे खातेदार पीक कर्जापासून वंचित राहणार आहेत. तर जुन्या खातेदारांनी मागील वर्षीचे कर्ज भरल्यास दहा टक्के वाढीव पीक कर्ज देण्यात येणार आहे.
खरीप हंगाम २०१७ -१८ ला लवकरच सुरुवात होणार असून, त्याकरिता शेतकऱ्यांना पीक कर्जाची नितांत गरज आहे. त्यामुळे जिल्हा बँक पीक कर्ज वाटपाला सोमवारपासून सुरुवात करणार आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज देताना ८५ टक्के रक्कम राज्य बँक व नाबार्डकडून मिळते, तर केवळ १५ टक्के रक्कम ही जिल्हा बँकेची असते. यावेळी राज्य बँक व नाबार्डने ८५ टक्के रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे नवीन खातेदारांना कर्ज न देता जुन्याच खातेदारांना कर्ज देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. बँकेचे जिल्ह्यात १६ हजार चालू खातेदार असून, ५८ हजार १०८ खातेदार थकीत आहेत. १६ हजार चालू खातेदारांपैकी ८ हजार खातेदारांनी मागील वर्षीचे कर्ज भरून शून्य टक्के व्याजदराचा फायदा घेतला आहे. जिल्हा बँकेने वसुलीमध्ये वाढ केली असून, ३१ मार्च २०१६ मध्ये बँकेचा एनपीए ८५.७६ टक्के होता. तर तो आता ६४.५८ टक्के झाला. एनपीएमध्ये २१ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या ३१ मार्च २०१६ च्या नियमानुसार कोणत्याही बँकेला अस्तित्व टिकविण्याकरिता ७ टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) असणे आवश्यक आहे. तर जिल्हा बँकेचे त्यावेळी ७.२८ टक्के होते. आता यामध्ये आरबीआयने बदल केला असून, बँकेचा सीआरएआर ९ टक्के असणे आवश्यक आहे, तर बुलडाणा जिल्हा बँकेचा सीआरएआर सध्या १०.८४ टक्के आहे. त्यामुळे बँकेची स्थिती भक्कम असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.
जिल्हा बँकेच्यावतीने शेती कर्ज तसेच बिगर शेती कर्जाची वसुली करण्यात येत आहे. मात्र, शेती कर्जाची वसुली ३२.९६ टक्के झाली असून, बिगर शेती कर्जाची वसुली ही केवळ ९.३३ टक्के झाली आहे. बिगर शेती कर्ज २०९.५० लाख देण्यात आले, त्यापैकी केवळ १८ कोटींची वसुली झाली. तसेच शेती कर्ज ४२२. ५४ लाख रुपये देण्यात आले. यापैकी १३९.२८ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. त्यामुळे बिगर कर्जाची वसुली अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. सदर कर्ज हे वैयक्तिक व सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्यासह विविध संस्थांना देण्यात आले आहे. यापैकी काही प्रकरणे न्यायालयातही दाखल आहेत. त्यामुळे कर्ज वसुलीत अडचणी येत आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने सरफेशी कायद्यानुसार कारखान्याची संपूर्ण मालमत्ता विक्री करून उर्वरित शिल्लक रक्कम वसुलीसाठी डी.आर.टी. न्यायालय नागपूर येथे वैयक्तिक मालमत्तेतून वसुलीसाठी दावा दाखल केला आहे.
आजपासून पीक कर्ज वाटप सुरू
जिल्ह्यात बँकेच्यावतीने सोमवारपासून जुन्या खातेदारांना खरीप हंगाम २०१७ - १८ करिता पीक कर्ज वाटपाला सुरूवात करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षीचे कर्ज भरले, त्यांना दहा टक्के वाढीव पीक कर्ज मिळणार आहे. त्यामुळे ज्या खातेदारांनी मागील वर्षीचे कर्ज भरले नाही, त्यांनी कर्ज भरून नवीन कर्ज घेण्याचे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.
राज्य बँकेकडे निधीची मागणी
जिल्हा बँकेच्यावतीने राज्य बँकेकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. जर राज्य बँकेने निधी दिला, तर नवीन खातेदार शेतकऱ्यांनासुद्धा कर्ज देण्यात येणार आहे. बँकेच्यावतीने वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र, राज्य बँक कोणता निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कर्ज देण्याची सोपी पद्धत
जिल्हा बँकेच्यावतीने शेतकऱ्यांना कर्ज देताना राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे प्रतारणा करण्यात येत नाही, तर अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज दिल्या जाते. जिल्हा बँकेतून कर्ज घेण्याकरिता शेतकऱ्यांना विविध कागदपत्रे गोळा करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी केवळ सातबारा व डिक्लेरेशन दिल्यास शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज केल्यानंतर त्वरित कर्ज मिळते.
बँकेच्यावतीने मागील वर्षी घेतलेले पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी नवीन कर्ज दहा टक्क्यांनी वाढीव देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही. बँकेतील १६ हजारांपैकी ८ हजार शेतकऱ्यांनी हा लाभ घेतला आहे. अन्य शेतकऱ्यांनीही मागील कर्ज भरून नवीन कर्ज घेण्याचा लाभ घ्यायला हवा.
- डॉ. अशोक खरात
सचिव, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, बुलडाणा