सोयाबीन प्रक्रिया प्रशिक्षणाने महिलांना उद्योगाची नवी दिशा
By admin | Published: July 4, 2017 07:30 PM2017-07-04T19:30:59+5:302017-07-04T19:30:59+5:30
हिवराआश्रम : साखरखेर्डा मधील मौजे शिंदी व मौजे साखरखेर्डा येथील ४५ महिलांना सोयाबिन प्रक्रिया विषयाचे प्रशिक्षण कृषी महाविद्यालय हिवरा बु. येथे पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवराआश्रम : महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय बुलडाणा, जन शिक्षण संस्थान बुलडाणा (श्रमिक विद्यापीठ) व विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा बु. यांच्या संयुक्त विद्यमाने मविम बुलडाणा अंतर्गत कार्यरत लोक संचालित साधन केंद्र, साखरखेर्डा मधील मौजे शिंदी व मौजे साखरखेर्डा येथील एकूण ४५ महिलांना सोयाबिन प्रक्रिया विषयाचे प्रशिक्षण कृषी महाविद्यालय हिवरा बु. येथे पार पडले. यामुळे महिलांसाठी रोजगाराची नवी संधी निर्माण झाली आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे व विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे आदी उपस्थित होते. यावेळी मोनिका खत्री यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा मविमचे जिल्हा उपजीविका विकास अधिकारी विशाल शालीग्राम पवार यांनी केली. त्यांनी मविम अंतर्गत जिल्हाभरात बचत गटातील महिलांचा उपजीविका विकास होण्याच्या दृष्टीने तसेच महिलांची आर्थिक वृद्धी होण्याच्या दृष्टीने घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सोबतच जन शिक्षण संस्थानचे प्रतिनिधी अरुण देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आश्रमाचे सचिव गोरे यांनी महिलांना स्वत:ची आर्थिक व सामाजिक वृद्धी करण्याबाबतचे मार्गदर्शन केले व सोबतच विवेकानंद आश्रमाबद्दल माहिती दिली. महिलांना आपल्याकडे सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या सोयाबिनवर प्रक्रिया करून त्यापासून सोया दुध, सोया पनीर व सोया कॉफी कशी बनवायची याबद्दल प्रात्यक्षिके करून माहिती दिली. महिलांनी सुद्धा खूप आवडीने सहभाग घेऊन सर्व बाबी स्वत: प्रत्यक्षिके करून समजून घेतल्या. सदर प्रशिक्षणाला गटांच्या महिलांसोबतच कृषी महाविद्यालयाच्या एकूण २० विद्यार्थीनींनी सुद्धा उस्फुर्त सहभाग घेतला होता.