अंड्याचा अनिल, तर उण्याचा झाला उमेश : पारधी वाड्यातील नावांना नवीन ‘लूक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 11:15 AM2020-08-23T11:15:48+5:302020-08-23T11:18:05+5:30
पूर्वी अंड्या नाव असलेल्याचे अनिल, उण्याचा उमेश अशी नावे, आता ठेवली जात असल्याची माहिती मेहकर तालुक्यातील परतापूर येथील युवकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोसा: पारधी वाड्यामध्ये वेगळ्या नावांचे महत्व आहे. जे चलनात असते असे नावे यांच्यामध्ये ठेवण्यात येतात. मात्र अलीकडील काळात युवक शिक्षणाकडे वळल्याने त्यांच्या नावातही बदल झाल्याचे दिसून येते. पूर्वी अंड्या नाव असलेल्याचे अनिल, उण्याचा उमेश अशी नावे, आता ठेवली जात असल्याची माहिती मेहकर तालुक्यातील परतापूर येथील युवकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पारधी समाज वसलेला आहे. शिक्षणाच्या प्रवाहात आल्याने या समाजात आता अनेक बदल झालेले दिसून येत आहेत. पूर्वी पारधी वाड्यामध्ये वेगवेळ्या नावांची क्रेझ होती. बुलेट, टायगर, दारासिंग, पिस्तुल्या, बेट, रामफळ, मिठू, कामुळा, बाबुलाल, आंड्या, उण्या, टिंगर, बाब्जा, नाहीजा, बाबुजन, रूपलाल अशी नावे ठेवली जायची. आताही पारधी वाड्यात वेगळ्या नावांची लोकं दिसून येतात. परंतु शिक्षणाचे प्रमाण या वाडयांमध्येही वाढल्याने वेगळी नावे ठेवण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
मेहकर तालुक्यातील परतापूर येथील पारधी वाड्यावर भेट दिली असता, पूर्वीपेक्षा आता बरेच नावे बदलल्याची माहिती नागरिकांनी दिली. सर्वपरिचित असलेली नावेच आता या भागात ठेवली जात आहेत. नुकत्याच लागलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेच्या निकालातही परतापूर येथील पारधी वाड्यातील मुलांनी चांगले यश मिळविल्याचे दिसून आहे.
मिथून, गोविंदा या सारख्या चित्रपट कलावंताचा प्रभाव आजही पारधी वाड्यातील नावावरून जाणवतो. शिक्षणाकडे युवक वळले असून, त्यांना चांगले यश येत असल्याची माहिती पदवीधर राजेंद्र बाबुसिंग पवार या युवकाने दिली.