नव्या कैद्यांना अकोला कारागृहात हलविणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:35 PM2020-03-17T12:35:27+5:302020-03-17T12:47:32+5:30
कैद्यांची कोर्ट पेशीही आता व्हीसीद्वारे घेण्यात येणार आहे.
- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाचा संभाव्य धोका पाहता जिल्हा कारागृहात खबरदारी घेण्यात येत आहे. कारागृहाची क्षमता १०१ असतांना सध्या कारागृहात २९४ बंदी आहेत. त्यामुळे नवीन कैद्यांना बुलडाण्याऐवजी अकोला येथील कारागृहात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कैद्यांची कोर्ट पेशीही आता व्हीसीद्वारे घेण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. जिल्हात कोरोना संशयावरुन १९ जण निरीक्षणाखाली आहेत. कोरोनाबाबत जिल्हा कारागृहात खबरदारी घेण्यात येत आहे.कैद्यांची दररोज वैद्यकिय तपासणी करण्यात येत आहे. सकाळी व सायंकाळी अशी दोन वेळेस डॉ. रोठे कैद्यांची तपासणी करतात. कैद्यांना सर्दी, खोकला, ताप, घसा दुखीचा त्रास होतो का, याकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.कैद्यांच्या रोजच्या दिनक्रमात योगा, प्राणायामचा समावेश असून त्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.
कारागृहातील वातावरण चांगले राहावे व कैद्यांच्या मनातील नकारात्मक विचार दूर सारण्यासाठी नियमित अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. भजनाची आवड असणारा भजन म्हणेल. कुणी पोवाडा, कुणी अभंग, कुणी सुविचार, कुणी कथा सांगेल अशा पद्धतीने कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येते. त्यामुळे कैद्यांचे आरोग्यही चांगले राहते व सकारात्मक विचार वाढतात, असे कारागृह अधिक्षकांनी सांगितले.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील सर्व कारागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व कारागृहांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहेत.