ट्रक-ॲपे अपघातात नवविवाहिता ठार, सासु-सासरे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:42 AM2021-07-10T10:42:15+5:302021-07-10T10:42:21+5:30
Accident News : ॲपेतून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय नविवाहितेचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : दहीगावकडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या ॲपेला ट्रकने पुढे जाण्याच्या नादात धडक दिल्याने ॲपेतून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय नविवाहितेचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. दरम्यान मृत विवाहीतेचे सासू-सासरे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ९ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास बोरगाव वसू गावाजवळ घडला.
शितल मंगेश होगे, असे मृतक नवविवाहितेचे नाव असून गेल्या २८ मे रोजीच ती विवाह बंधनात अडकली होती. शितल आणि तिचे सासरे भास्कर होगे (५५), सासू लता होगे (५०) हे चिखलीवरून दहीगावकडे प्रवासी ॲपेद्वारे (एमएच-२८-एच-४७२३) जात होते. दरम्यान चिखली - खामगाव महामार्गावरील बोरगाव वसू गावाजवळ एमएल-०१-एडी-११८७ क्रमांकाच्या ट्रकने या ॲपेला अेाव्हटेक करण्याच्या प्रयत्नात धडक दिली. त्यामुळे ॲपेत बसलेल्या शितल होगे बाहेर फेकल्या गेल्या. त्यातच ट्रकच्या मागील चाकात त्या आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सासू सासरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथे उपचार करण्यात येत आहेत. मृतक शितल हीचे २८ मे रोजी लग्न झाले होते. लग्न होवून जेमतेम ४२ दिवस उलटण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल काळे हे करीत आहेत.