पालकांची हलगर्जी ; ४६६ विद्यार्थी 'आरटीई' प्रवेशापासून वंचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:44 IST2019-05-17T14:42:44+5:302019-05-17T14:44:36+5:30
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी काही पालकांनी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क न केल्यामुळे जिल्ह्यातील ४६६ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत.

पालकांची हलगर्जी ; ४६६ विद्यार्थी 'आरटीई' प्रवेशापासून वंचीत
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पाहिल्याच लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी काही पालकांनी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क न केल्यामुळे जिल्ह्यातील ४६६ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. अपात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना आरटीईतील प्रवेशापासून वंचीत रहावे लागणार असून, पालकांची हलगर्जी (संपर्क न करणे) विद्यार्थ्यांच्या ‘शिक्षण हक्कावर’ बेतली असल्याचे दिसून येत आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहयाीत शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९०८ जागांसाठी सुरू असलेल्या आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ५ हजार ३२८ आॅनलाइन अर्ज आले. त्यासाठी लॉटरीपद्धतीने पहिली फेरी पूर्ण करण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना वेळोवेळी मोबाईलवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाडून माहिती पोहचविण्यात आली; मात्र प्रवेशाच्या १० मे या अंतीम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील काही पालकांनी शाळा, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे संपर्क न केल्यामुळे ४२३ विद्यार्थी आरटीईच्या प्रवेशासाठी अपात्र ठरले आहेत. तर ४३ विद्यार्थी हे कागदपत्राच्या त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ८१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ खामगाव तालुक्याचा समावेश आहे. अपात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीतही प्रवेश घेता येणार नसल्याने त्यांना या मोफत प्रवेशापासूनच वंचीत राहावे लागणार आहे.
४३ अर्ज कागदपत्राच्या त्रुटीत
आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ४३ अर्ज हे कागपत्राच्या त्रुटीत अडकल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने अपात्र ठरविले आहे. यामध्ये बुलडाणा तालुक्यात १३, देऊळगाव राजा ८, खामगाव चार, मलकापूर तीन, मोताळा दोन, नांदूरा नऊ, संग्रामपूर एक असे एकूण ४३ विद्यार्थी कागदपत्राच्या त्रुटीमुळे अपात्र ठरविण्यात आलेले आहेत.
सिंदखेड राजा तालुक्यात एकही अपात्र नाही
आरटीईअंतर्गत प्रत्येक तालुक्यातून काही प्रमाणात विद्यार्थी अपात्र ठरलेले आहेत. ज्यामध्ये कागद पत्राच्या त्रुटी किंवा संपर्क न करणे अशा कारणांचा समावेश आहे. परंतू सिंदखेड राजा तालुक्यातून एकही विद्यार्थी अपात्र ठरलेला नाही, हे विशेष. सिंदखेड राजा तालुक्यात एकुण १६ शाळा असून १६५ रिक्त जागा आहेत. तर १५२ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. पाहिल्या लॉटरीमध्ये एकूण २९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून या तालुक्यातून एकही विद्यार्थी अपात्र नाही.
१६०९ प्रवेश पूर्ण
४१० मे पर्यंत झालेल्या राबविण्यात आलेल्या आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जिल्हाभरातून एकूण १ हजार ६०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात २२२, चिखली ९७, देऊळगाव राजा ६६, जळगाव जामोद ११७, खामगाव २२६, लोणार १३५, मलकापूर १७९, मेहकर १८८, मोताळा ४८, नांदूरा ८७, संग्रामपूर ५८, शेगाव १५७, सिंदेखड राजा २९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले.