आदिवासी विद्यार्थ्यांंना घडविणारे निंबाळकर गुरूजी
By admin | Published: September 5, 2014 12:22 AM2014-09-05T00:22:48+5:302014-09-05T00:22:48+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांंना घडविणारे निंबाळकर गुरूजी.
जयदेव वानखडे /जळगाव जामोद
गावात जायला रस्ता नाही. स्वातंत्र्याची ६७ वर्षे उलटली तरी अद्याप ज्या गावात एसटी पोहचली नाही, जेथे मुलांची भाषा शिक्षकाला कळत नाही अन शिक्षक काय म्हणतात ते मुलांना समजत नाही, अशा विपरीत परिस्थितीत जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या उंच भागावर अतिशय दुर्गम भागातल्या भिंगारा गावात राहून गेल्या २00४ पासून अध्यापनाचे काम करणारे बालाजी सुभाष निंबाळकर गुरूजी या परिसरात लोकप्रिय ठरले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातला तरूण शिक्षकाची नोकरी मिळते म्हणून जेथे कोणीही जाण्यास तयार नाही अशा दुर्गम भागात जातो आणि भिंगारा या आदिवासी लोकवस्तीच्या गावाला आपलं करतो. गावात कोणत्याच सुविधा नाहीत, वीज नाही, आपली भाषा कळणारी माणसं नाही जेथे केवळ पायी अथवा दुचाकीनेच जावे लागते अशा या गावात जावून तेथे राहून विद्यार्थी घडविण्याचे काम निंबाळकर गुरूजींनी भाषेची अडचण दूर व्हावी म्हणून गुरूजींनीच प्रथम आदिवासी भाषा अवगत केली अन् मग त्या विद्यार्थ्यांंना सुरू केले शिक्षणाचे धडे. अनंत परिश्रमानंतर आज ती शाळा आनंददायी शाळा झाली. २५२ पटसंख्या असलेल्या शाळेत गुरूजींनी लावलेली शिक्षणाची ओढ कामी आली. एकही विद्यार्थी घरी राहत नाही. दररोज शाळेत येतो, गणित, बुध्दीमत्ता, इंग्रजी, मराठी, हिंदी लिहिता वाचता आणि बोलायला शिकला. येथील विद्याथ्यराना शिकवण्यासाठी त्यांनी चित्ररूप माहिती, बोलक्या भिंती, अंक कार्डाचा वापर, गाणी, गोष्टी, खेळ, चर्चा, गटपध्दतीने निसर्गाच्या सान्निध्यात शिकविले. त्यांच्याशी ह्या नेहमीच्या संपर्कामुळे ती मुले जवळ आली, यासाठी गुरूजी तेथे वास्तव्यास असल्याने शाळेतच राहायचे त्यामुळे २४ तास शाळा विद्यार्थ्यांंंना खुली असायची. निंबाळकर गुरूजी सध्या या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. खेळातही येथील विद्यार्थी प्रवीण असून केंद्र, तालुका पातळीवर चमक दाखवितात.