बंद पडलेले नऊ काेविड सेंटर पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:32 AM2021-03-06T04:32:28+5:302021-03-06T04:32:28+5:30
बुलडाणा : फेब्रुवारी महिन्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काेराेना संसर्ग वाढतच असल्याने जिल्हा ...
बुलडाणा : फेब्रुवारी महिन्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काेराेना संसर्ग वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनाने बंद केलेले नऊ काेविड सेंटर पुन्हा सुरू केले आहेत. तसेच नाेकरीवरून कमी केलेले कंत्राटी कर्मचारी पुन्हा नियुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, काेराेना असेपर्यंतच कंत्राटी कर्मचाऱ्यांना नाेकरी आहे का, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
गतवर्षी काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढल्याने जिल्हाभरात तालुकानिहाय काेविड सेंटर उभारण्यात आले हाेते. काेविड सेंटरवर कंत्राटी पद्धतीने डाॅक्टर, अधिक परिचारिका यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. डिसेंबरमध्ये काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात घटली हाेती. त्यामुळे, अनेक काेविड सेंटर बंद करण्यात आले हाेते. तसेच या सेंटरमध्ये नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले हाेते. फेब्रुवारी महिन्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे. काेराेना संसर्ग वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनाने बंद केलेले काेविड सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कामावरुन कमी केलेले कंत्राटी कर्मचारी पुन्हा नियुक्त करण्यात येणार आहे.
कायमस्वरुपी नियुक्ती द्या
गतवर्षी काेराेना काळातही जीव धाेक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या कंत्राटी डाॅक्टर,अधिपरिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले हाेते. त्यामुळे, जिल्हाभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राेष व्यक्त केला हाेता. तसेच पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले हाेते. आता पुन्हा काेराेना रुग्ण वाढत असल्याने याच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आता तरी शासनाने कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी,अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
काेविड सेंटरवर सुविधांचा अभाव
काेराेना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने हाेम क्वारंटाईन सुविधा बंद केली आहे. त्यामुळे, काेविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढल्याने तेथील सुविधा अपुऱ्या ठरत आहेत. जिल्हाभरातील काेविड सेंटरमधील रुग्णांच्या तक्रारी वाढतच असल्याचे चित्र आहे. एकाच महिन्यात ताण वाढल्याने प्रशासनाची ही तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे.
१७१ कंत्राटी कर्मचाऱ्यांची हाेणार नियुक्ती
गतवर्षी जिल्ह्यात १४ काेविड सेंटर सुरू हाेते. फेब्रुवारीमध्ये रुग्ण वाढत असल्याने आणखी नऊ काेविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. २२ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच १७१ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसात या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच काेराेना रुग्णांची संख्या वाढल्यास आणखी काेविड सेंटर सुरू करण्याची शक्यता आहे.