नऊ हजारावर शेतकरी अन्नधान्य योजनेपासून वंचित
By admin | Published: February 7, 2017 03:09 AM2017-02-07T03:09:49+5:302017-02-07T03:09:49+5:30
दोन महिन्यापासून ४ हजार ७00 क्विंटल अन्नधान्य आलेच नाही
उद्धव फंगाळ
मेहकर (जि. बुलडाणा), दि. ६- शेतकर्यांना गहू व तांदूळ स्वस्त दरात मिळावे, यासाठी प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानामधून दरमहा शेतकर्यांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात येते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ४ हजार ७00 क्विंटल अन्नधान्य मेहकर तालुक्यात आले नसल्याने ९ हजारावर लाभार्थी शेतकरी लाभार्थी अन्नधान्य योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.
दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्यांचे मनोबल वाढावे, शेतकर्यांना शासनाकडून मदत व्हावी यासाठी शेतकरी अन्नधान्य योजना सुरु करण्यात आली. मात्र, या योजनेचा मेहकर तालुक्यात बोजवारा उडाला असून, डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याचे अन्नधान्य शेतकरी लाभार्थ्यांना मिळालेच नाही. त्यामुळे हजारो शेतकरी अन्नधान्य योजनेपासून वंचित आहेत. तालुक्यात शेतकरी अन्नधान्य योजनेचे ९ हजार ८२२ शेतकरी लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दर महिन्याला १ हजार ८७४.९६ क्विंटल गहू तर ४६८.७४ क्विंटल तांदूळ लागतो. मात्र दोन महिन्यापासून अन्नधान्य आलेच नाही. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याने शेतकर्यांमध्ये रोष निर्माण होत आहे.
डिसेंबर व जानेवारी महिन्याचा शेतकरी अन्नधान्य योजनेतील गहू व तांदूळ आले नसल्याने वाटप करण्यात आले नाही. त्यासंदर्भात जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले असून, धान्य आल्यावर लवकरच वाटप करण्यात येईल.
- ए. एफ. सैय्यद
अन्नपुरवठा निरिक्षक अधिकारी, मेहकर.