नितीन राठोड अमर रहे ! 40 शहीद जवानांवर अंत्यसंस्कार; संपूर्ण देश बुडाला शोकसागरात;
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 08:03 AM2019-02-17T08:03:08+5:302019-02-17T08:03:56+5:30
लोकांनी दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा। जवानांना ‘अमर रहे’ची शेवटची सलामी
नवी दिल्ली : पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सीआरपीएफच्या ४0 जवानांवर त्यांच्या मूळ गावी शनिवारी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा हजारो भारतवासीयांना अश्रू आवरले नाहीत. या अंत्यसंस्काराची दृश्ये विविध वृत्तवाहिन्यांवर पाहताना संपूर्ण देशही शोकसागरात बुडून गेला होता. अंत्यसंस्काराची दृश्येच हेलावून टाकणारी होती. यापैकी काही शहीद जवानांच्या लहान मुलांवर आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली, तर बऱ्याच ठिकाणी जवानांच्या पत्नी व नातेवाईक याप्रसंगी भोवळ येऊ न खालीच पडले.
या जवानांवर त्यांच्या राज्यांत अंत्यसंस्कार करण्यात आले, तिथे हजारो लोक हजर होते. ते सारे जण जवानांच्या अमर रहेच्या घोषणा देत होते. त्याचबरोबरच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही ऐकू येत होत्या. सर्व जवानांच्या शवपेटिका शुक्रवारी संध्याकाळी वा शनिवारी सकाळी त्यांच्या घरी आल्या, तेव्हा घरची मंडळी धाय मोकलूनच रडायला लागली. यातील बरेचसे जवान रजेवरून कामावर रुजू होण्यासाठी जम्मूला गेले होते आणि तेथून श्रीनगरला जात असतानाच दहशतवादी हल्ला झाला.
पोलिसांनी बंदुकांनी सलामी दिली, तेव्हाचे दृश्य अतिशय करुण होते. आपला पती, मुलगा, वडील यांना पुन्हा कधीच पाहता येणार नाही, या भावनेने त्यांचे कुटुंबीय नातेवाईक पार खचून गेले होते. अनेकांना आपला मित्र गमावल्याचे दु:ख होते आणि संपूर्ण देशाला दु:ख होते, ते म्हणजे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात इतक्या भारतीय जवानांना जीव गमवावा लागल्याचे.
आतापर्यंत भारतात कधीही एकाच दिवशी एवढ्या जवानांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली नव्हती. त्यामुळे जवानांच्या मृत्यूचा बदला भारताने घ्यायलाच हवा, अशी मागणी तिथे उपस्थित समुदाय करत होता.
दीक्षित, राठोड अमर रहे
नागपूर : विदर्भातील संजयसिंह दीक्षित राजपूत व नितीन राठोड हे दोन जवान दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झाले. त्यांच्यावर शनिवारी संध्याकाळी सरकारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हजारो लोक उपस्थित होते आणि ते ‘संजय दीक्षित
अमर रहे’, ’नितीन राठोड अमर रहे; याबरोबरच ‘भारतमाता की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा देत होते. या दोघांच्या कुटुंबीयांना त्याच ठिकाणी राज्य सरकारतर्फे ५0 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.
काश्मीरच्या स्फोटामध्ये लष्करी अधिकारी हुतात्मा
जम्मू : राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा विभागात दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेला बॉम्ब निकामी करताना स्फोट झाल्याने लष्कराच्या इंजिनीअरिंग विभागाचा मेजर चित्रेश सिंग बिश्त हुतात्मा झाले. स्फोटात एक जवानही जखमी झाला. जवानाला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपाशी हा प्रकार घडला. मेजर बिश्त हे डेहराडूनचे रहिवासी होते.
पाकिस्तानला भारताचा मोठा आर्थिक धक्का
पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्यानंतर भारताने त्या देशाला आणखी एक धक्का दिला आहे. पाकिस्तानातून आयात होणाºया सर्व वस्तुंवरील कस्टम्स ड्युटी २00 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी बनावटीच्या वस्तू
महाग होतील आणि त्यामुळे त्या कोणी विकत घेण्याच्या फंदात पडणार नाही.
नालासोपाºयात ५ तास रेल रोको
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकात सकाळी नागरिकांनी रुळावर उतरून लोकल बंद केल्या. पाच तास हा रेल्वे रोको सुरू होता. मुंबई, ठाण्यातही ठिकाणी बंद पाळण्यात आला.
- सविस्तर वृत्त/४
Maharashtra: Visuals from Malkapur in Buldhana district as mortal remains of CRPF Head Constable Sanjay Rajput are being brought for last rites. Family members pay their tribute to him. (16/2/19) pic.twitter.com/RsLgywN9iG
— ANI (@ANI) February 16, 2019