रस्त्यावरचे डांबरही सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:43 AM2021-06-09T04:43:06+5:302021-06-09T04:43:06+5:30
धाड : ग्रामीण भागातील रस्त्यावरून रहदारी करणे आता जीवावरचा खेळ बनला आहे. या रस्त्याने साधे चालणेही अवघड झाले आहे. ...
धाड : ग्रामीण भागातील रस्त्यावरून रहदारी करणे आता जीवावरचा खेळ बनला आहे. या रस्त्याने साधे चालणेही अवघड झाले आहे. अनेक मार्गांवर खड्ड्यांची मोजदाद केल्यास कधी तरी हा मार्ग पूर्णतः डांबरीकरण झाला होता काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. खड्डेमय रस्त्याने अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. अनेक रस्त्यांवर तर डांबर शोधूनही सापडत नसल्याचे चित्र आहे.
अगदी नजीकच्या असलेल्या ८ ते १० कि.मी. लांबीच्या ग्रामीण मार्गाची डागडुजी, दुरुस्ती आदी काही प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्षेत येतात किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. धाड ते चांडोळ या गावांचे किमान अंतर नऊ कि.मी. आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर बांधकाम विभागाच्या वतीने प्रतिवर्षी देखभाल दुरुस्ती केली नाही. प्रत्येक वर्षी या मार्गाची दुरवस्था अधिक प्रमाणात होत गेली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखली या कार्यालयाच्या अंतर्गत धाड भागातील रस्ते येतात. गतकाळात धाड-चांडोळ, धाड-भडगाव, धाड-जामठी, धाड-कुंबेफळ, टाकळी या रस्त्यांची अगदी चाळण झाली आहे. वरचेवर काही ठिकाणी ठिगळे लावल्यागत दुरुस्ती करून आपण जबाबदारी पूर्ण केल्याचे एक समाधान बांधकाम विभागाचे अधिकारी करून घेत आहेत. मात्र त्यांच्या या निर्धास्त कारभाराने या भागातील अनेकांनी याच रस्त्यावर अपघातात आपला अमूल्य जीव गमावला आहे, हे दुर्दैव आहे.
रस्ता डांबीकरणाचा होता का?
धाड भागात चांडोळ हे एक मोठी लोकसंख्या आणि व्यापारी केंद्र असलेले गाव आहे. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, काॅलेज, बँक, विविध सार्वजनिक सेवा केंद्रे आहेत. विदर्भ आणि मराठवाडा परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना या ठिकाणी दैनंदिन व्यवहारासाठी चांडोळ येथे ये-जा करावी लागते. परंतु या गावाला जोडणारा महत्त्वपूर्ण धाड-चांडोळ रस्ता मागणी काही वर्षांत रहदारीच्या कामाचा राहिलाच नाही. आता हा रस्ता डांबरीकरणाचाच आहे काय, असा प्रश्न वाहनधारकांना पडतो.
रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काहीही उपाययोजना केली नसल्यामुळे आज पावसाळ्यात हा रस्ता नागरिकांना जीवघेणा ठरू पाहत आहे. यावर तातडीने बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्ता रहदारीकरता सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.