ना पुस्तके ना वही, ऑनलाइन शिक्षणाची घाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:28+5:302021-06-26T04:24:28+5:30

सुधीर चेके पाटील चिखली : विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नवे शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होत ...

No books, no rush for online learning! | ना पुस्तके ना वही, ऑनलाइन शिक्षणाची घाई !

ना पुस्तके ना वही, ऑनलाइन शिक्षणाची घाई !

Next

सुधीर चेके पाटील

चिखली : विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नवे शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शाळा सुरू होणार आहेत. काही मोजक्या शाळांचा अपवाद वगळता इतर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी मागचे वर्ष पाठ्यपुस्तकाविना कसेबसे ढकलले आहे. त्यात यंदाही पाठ्यपुस्तके उपलब्ध नसताना आणि ऑनलाइन शिक्षणात शिक्षकांना मर्यादा व अडचणी असताना शैक्षणिक सत्रास सुरुवात करण्याची घाई करण्यात आली असल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. नोव्हेंबरमध्ये इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये ५ वीपासून पुढील वर्ग भरविण्यात आले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट धडकली आणि सर्व शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. यामध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेबाबतही गोंधळ उडाला असतानाच आता तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याची भीती असल्याने यंदाही विद्यार्थ्यांना स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून केवळ बाराखडी, आकडेमोड या पद्धतीचेच शिक्षण घ्यावे लागणार आहे. दरम्यान, विदर्भात २८ जून पासून नवीन शैक्षणिक सत्र या पद्धतीनेच सुरू होत आहे. गतवर्षी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना दिवसभरात अथवा एक-दोन दिवसांत एखादा धडा विद्यार्थ्यांना शिकविला जात होता. त्यातही पाठ्य-पुस्तके नसल्याने प्रामुख्याने इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व डोक्यावरून जाणारे ठरले. दरम्यान, स्वाध्याय उपक्रमास सुरुवात झाली. यामध्ये चिखली तालुका राज्यात अव्वल ठरला असला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान या माध्यमातून भरून निघणारे नाही. परिणामी गतवर्षाचा पूर्ण अभ्यास बुडाला असे असले तरी आता प्रमोट होऊन पुढच्या वर्गात दाखल होणारे विद्यार्थी अभ्यासक्रमाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. प्रामुख्याने विद्यार्थ्यांकडे साधनसुविधांचा अभाव असल्याने ऑनलाइन शिक्षणात यश नाही, हे गतवर्षीच सिद्ध झालेले आहे. त्यात यंदाही पाठ्यपुस्तकेच उपलब्ध नसल्याने शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने शिकविले तरी ते समजणे अवघड आहे. तथापि, ऑनलाइन शिक्षण देण्याबाबत शिक्षकांसमोरही मर्यादा आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांतही संभ्रम आहे. पुस्तके नसताना पालकही आपल्या पाल्यांना शिकवू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाहीत. पालकांच्या मोबाइल फार-फार तर अर्धा ते एक तासापर्यंत विद्यार्थ्यांकडे असतो, अशा परिस्थितीत यंदाही ऑनलाइनच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि पालकांचे आर्थिक नुकसान कसे भरून निघेल, असा प्रश्न कायम आहे.

जि.प. शाळांत होणार जुन्या पुस्तकांचे नियोजन

जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासोबतच पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासंदर्भाने प्रशासनाने शाळास्तरावर विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके संकलित करून त्यांच्या वाटपाचे नियोजन केले आहे. मात्र, अनेक खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांचा प्रश्न गतवर्षीप्रमाणेच अनुत्तरित आहे.

४६ हजार ५९ विद्यार्थी होणार प्रमोट

चिखली तालुक्यात गतवर्षी इयत्ता १ ते १० पर्यंत एकूण ४६ हजार ५९ विद्यार्थीसंख्या होती. या विद्यार्थ्यांना यंदा ढकलपास (प्रमोट) करण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा प्रथमच इयत्ता पहिलीत नवप्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही प्रवेशाबाबत संभ्रमावस्था आहे.

स्वाध्याय उपक्रमात तालुका अव्वलस्थानी

गतवर्षी स्वाध्याय उपक्रमात उपक्रम सोडविला आहे. चिखली अव्वलस्थानी होता. एकूण विद्यार्थीसंख्येच्या ९५.८३ टक्के विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. स्वाध्याय उपक्रम काहीअंशी दिलासादायक असला तरी त्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पूर्णत: भरून काढण्याची क्षमता नसल्याचे अनेक पालकांचे मत आहे.

Web Title: No books, no rush for online learning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.