ना कॉल, ना ओटीपी, तरी बॅंकेतून पैसे गायब; फ्री गेम, अनोळखी ॲपला परमिशन टाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:26+5:302021-06-19T04:23:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार अनेकांची फसवणूक करीत असल्याचे समाेर आले आहे. उल्लेखनीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार अनेकांची फसवणूक करीत असल्याचे समाेर आले आहे. उल्लेखनीय म्हणजे ना कॉल, ना ओटीपी तरीही बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. यात अनोळखी ॲप डाऊनलोड करताना "ऑटो रिड ओटीपी' परवानगी घेतली जात आहे. यामधूनच हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी आम्ही अमुक - तमुक बँकेतून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहोत, अशी कारणे सांगून ग्राहकांना प्रथम कॉल व त्यानंतर ओटीपी विचारून त्यांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केली जायची. विश्वास पात्र गोष्ट बोलून ग्राहकांची होणारी फसवणूक आता कालबाह्य झाल्याने डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या पद्धतीमध्ये गुन्हेगार आता बदल करीत असल्याचे चित्र आहे. फ्रीमध्ये येणारे ॲप आणि गेम धाेकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.
पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच
ऑनलाईन फसवणूक करणारे राज्याबाहेरील किंवा देशाबाहेरील असतात. त्यामुळे, अशा आराेपींना शाेधून काढून पैसे परत मिळवून देणे अशक्य आहे.
फसवणूक हाेताच काही तासात तक्रार झाल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता असते. मात्र, अनेक वेळा तक्रार करण्यास बराच उशीर हाेताे. त्यामुळे, पैसे परत मिळण्यात अडचणीत येतात.
अनेक वेळा क्रेडिट कार्ड क्रमांकावरून फसवणूक केली जाते. तसेच ऑनलाईन पैसे काढून घेतल्यास आराेपी तातडीने काढून घेतात. काही बॅंकाही सहकार्य करीत नसल्याने पैसे परत मिळत नाहीत.
अनोळखी ॲप नकोच !
डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाजारात अनेक ऑप्लिकेशन्स आले आहेत. हेच अप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या नादात अनेक ग्राहक 'सर्व टर्मस आणि सर्व कंडिशन्स अप्लाय' करतात. त्यामध्येच 'ऑटो ओटीपी रिड' यालासुद्धा परवागनी देऊत टाकतात.
अनोळखी ॲप डाऊनलोड केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. परिणामी आता स्वत: जागरूक होऊन नागरिकांनीच अनोळखी ॲप नको रे बाबा, असे म्हणण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते मेपर्यंत फसवणुकीच्या १० तक्रारी आहेत.
यामध्ये नागरिकांची १० लाख ४६ हजार १४५ रुपयांची फसवणूक झाली.
सन २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये तक्रारींची संख्या जास्त हाेती.
ॲनी डेस्क, स्क्रीनशेअरसारख्या ॲपमधून सर्वसामान्यांची फसवणूक हाेऊ शकते. अनाेळखी ॲपला परवानगी देऊ नये. तसेच नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. फसवणूक झाल्यास तातडीने पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. अनेकदा माेबाईल हरवल्यास त्याची तक्रार करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांनी माेबाईल हरवल्यास त्याची पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी.
- विलासकुमार सानप सहा. पाेलीस निरीक्षक, सायबर सेल