खामगाव पालिकेत स्पर्धात्मक निविदेला हरताळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 03:26 PM2020-01-03T15:26:18+5:302020-01-03T15:26:44+5:30
या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी चौकशीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: नागरी दलितवस्ती योजनेतंर्गत विविध भागातील मिनी हायमास्ट लावण्यासाठी एकाच कंत्राटदाराने २० कामांच्या पूरक निविदांसह ६० निविदा भरल्याचा धक्कादायक प्रकार पालिकेत समोर आला. परिणामी, खामगाव पालिकेत स्पर्धात्मक निविदेला हरताळ फासण्यात आल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी चौकशीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाल्याचे दिसून येते.
नागरी दलित वस्ती योजनेतंर्गत खामगाव शहरातील विविध भागात मिनी हायमास्ट लावण्यासाठी आपल्या निविदेसह दोन पूरक(सर्पोटींग) निविदा पालिकेला सादर केल्या आहेत. शहरातील २० कामांच्या ४० पुरक निविदांसह सर्व ६० निविदा एकाच कंत्राटदाराने भरल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात दाखल एका तक्रारीवरून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी तातडीने चौकशी समिती नेमली आहे. निविदेची अनामत रक्कम आणि खरेदी रक्कम एकाच खात्यातून भरण्यात आल्याने खामगाव पालिकेतील बनावट निविदा प्रक्रीयेचे बिंग फुटले आहे. या प्रकारामुळे पालिकेतील मिनी हायमास्ट घोटाळा बाहेर येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचा सुत्रांचा दावा आहे.
पाच सदस्यीय समिती गठीत!
या घोळाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर राहणार आहेत. तर उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी, लेखापाल अक्षय जोरी, अंतर्गत लेखा परिक्षक आदित्य शिवेकर, विद्युत पर्यवेक्षक सतीश पुदाके समितीचे सदस्य आहेत.
कंत्राटदारांचे स्पष्टीकरण असमाधानकारक!
यामध्ये कंत्राटदार असलेल्या तिघांना पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली. त्यांना खुलासा सादर करण्याचे सुचविले होते. मात्र, तिनही कंत्राटदारांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसेच आवश्यक ते पुरावे सादर केले नसल्याचे समोर आले आहे.
निविदा दाखल केल्याचे खोटे भासविले!
कंत्राट मिळविण्यासाठी स्पर्धात्मक प्रक्रीयेतून तिन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. या माध्यमातून नियमांची पुर्तता करण्यात आली. मात्र, या प्रकरणी बॅकेतून सर्व व्यवहार एकाच खातेधारकाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सदर निविदा प्रकियेत तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांनी निविदेत भाग घेतल्याचे भासवून एकाच कंत्राटदाराने निविदा भरल्याचे उघडकीस आले आहे.