या दुर्गा उत्सवात ना डीजे, ना गुलाल! ठाणेदारांच्या सूचनांकडे मंडळांचे लक्ष
By ब्रह्मानंद जाधव | Published: October 12, 2023 12:57 PM2023-10-12T12:57:23+5:302023-10-12T12:58:12+5:30
गणेश उत्सवानंतर आता आता दुर्गा उत्सवाचे वेध लागले आहेत.
बुलढाणा : गणेश उत्सवानंतर आता आता दुर्गा उत्सवाचे वेध लागले आहेत. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांनी दुर्गा विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळू नये, तसेच डीजेचा वापरसुद्धा न करण्याच्या सूचना दिल्याने परिसरातील दुर्गा उत्सव मंडळाचे या सूचनांकडे लक्ष लागले आहे.
बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील ३९ गावांत २७ दुर्गा उत्सव मंडळांकडून दुर्गा देवीची स्थापना करण्यात येते. गणेश उत्सवाप्रमाणे दुर्गा उत्सवदेखील शांततेत पार पडावा, यासाठी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात दुर्गा उत्सव मंडळ तसेच गावातील पोलिसपाटलांची ठाणेदार माधवराव गरुड यांनी गुरुवारी बैठक घेतली.
ठाणेदार गरुड म्हणाले की, आपल्या गावातील शांतता आपल्याच हाती आहे, त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशांचे पालन करून दुर्गा उत्सव शांततेत साजरा करा. मिरवणुकीत गुलाल उधळू नये, डीजेचा वापर टाळावे, मिरवणुकीत दारू पिऊन सहभाग घेऊ नका, अशा प्रकारच्या अनेक सूचना त्यांनी दिल्या. बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील २७ दुर्गा उत्सव मंडळांचे पदाधिकारी व पोलिसपाटील यावेळी उपस्थित होते.