खामगाव जिल्हा निर्मितीच्या आशेवर यावर्षीही पाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:09 AM2018-04-28T02:09:41+5:302018-04-28T02:09:41+5:30

बुलडाणा : नवीन जिल्हा निर्मितीचा मुद्दा सातत्याने सोशल मीडियामध्ये चर्चेत राहत असला, तरी जुना इतिहास पाहता महाराष्ट्रदिनीच नवीन जिल्ह्याची घोषणा झालेली आहे; मात्र त्या पृष्ठभूमीवर खामगाव जिल्हा निर्मितीचा मागोवा घेतला असता प्रशासकीय पातळीवर कुठलीही हालचाल नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, यंदाही खामगाव जिल्हा निर्मितीच्या आशेवर पाणी फिरल्याचे चित्र आहे.

no expectation to build Khamgaon disrict in this year? | खामगाव जिल्हा निर्मितीच्या आशेवर यावर्षीही पाणी?

खामगाव जिल्हा निर्मितीच्या आशेवर यावर्षीही पाणी?

Next
ठळक मुद्देप्रशासकीय पातळीवर हालचाल नाही संभाव्य क्षेत्रफळ तीन हजार ८१० चौ. किमी

नीलेश जोशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नवीन जिल्हा निर्मितीचा मुद्दा सातत्याने सोशल मीडियामध्ये चर्चेत राहत असला, तरी जुना इतिहास पाहता महाराष्ट्रदिनीच नवीन जिल्ह्याची घोषणा झालेली आहे; मात्र त्या पृष्ठभूमीवर खामगाव जिल्हा निर्मितीचा मागोवा घेतला असता प्रशासकीय पातळीवर कुठलीही हालचाल नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, यंदाही खामगाव जिल्हा निर्मितीच्या आशेवर पाणी फिरल्याचे चित्र आहे. त्यातच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवीन जिल्हा निर्मितीसंदर्भातील निकष ठरविण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. परिणामी, यंदाही खामगाव जिल्हा हा केवळ एक आस राहण्याची शक्यता आहे.
संकल्पित स्तरावरील खामगाव जिल्ह्याचे संभाव्य क्षेत्रफळ हे तीन हजार ८१० चौ. किमी राहण्याची शक्यता असून, २०१५ मध्ये यासंदर्भातील शेवटचा अहवाल बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांना पाठविला होता. तेव्हापासून या मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयास राज्य शासनाकडून कुठलेही पत्र अथवा सूचना आलेली नाही; मात्र सातत्याने खामगाव जिल्ह्याचा हा मुद्दा चर्चेत राहत आलेला आहे. तसा तो महाराष्ट्र दिनाच्या पृष्ठभूमीवर नेहमीच चर्चेत येतो. सोबतच यासंदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयातील फाइलमधील माहितीही गोपनीय ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जिल्हा निर्मिती होते किंवा नाही, हे येणारा काळच सांगेल. यानिमित्ताने खामगाव जिल्हा हा मुद्दा पुन्हा चर्चेत राहणार आहे.
गेले संपूर्ण वर्ष हे शेतकरी कर्जमुक्तीचा मुद्दा हाताळण्यात गेले. परिणामी, स्वतंत्र जिल्हे निर्मितीचा मुद्दा हा काहीसा अडगळीत पडला होता; मात्र आता लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या मुद्याने मध्यंतरी पुन्हा उचल खाल्ली होती. २२ जिल्ह्यांचा विषय गेल्या एक ते दीड वर्षापासून चर्चेत आहे. त्यात प्रामुख्याने अहेरी, चिमूर, परतवाडा, खामगाव आणि पुसदची नावेही त्यादृष्टीने चर्चेत होती.
संभाव्य खामगाव जिल्ह्याचा विचार करता सुमारे २५ लाख ८८ हजार ३३ लोकसंख्या असलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे विभाजन केल्यास ११ लाख ५० हजार लोकसंख्येचा खामगाव तर १४ लाख ३८ हजार लोकसंख्येचा बुलडाणा जिल्हा राहू शकतो. जिल्हा मुख्यालयाच्या दृष्टीने पायाभूत सुविधांचा विचार करता खामगाव शहर त्यादृष्टीने पूर्णपणे तयार आहे. विविध कारणांमुळे प्रशासकीय कार्यालयांच्या इमारती, अपेक्षित जागा येथे उपलब्ध असून, त्यापैकी बहुतांश कार्यालयांची बांधकामे झालेली आहेत; मात्र जिल्ह्याचे नाव प्रसंगी खामगावऐवजी शेगाव असे होऊ शकते. वानगी दाखल अलिबाग जिल्हा असला, तरी माइलस्टोन असलेल्या रायगड किल्ल्याच्या नावावरून जिल्ह्याचे नाव रायगड झाले आहे. तसेच खामगाव जिल्ह्याच्या बाबतीत होऊ शकते.

जिल्हे निर्मिती कोणाच्या फायद्याची? 
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यानंतर नवीन जिल्हे निर्मिती आणि वेगळा विदर्भ राज्य हे मुद्दे घेऊन पुन्हा जनतेसमोर जाण्याची भाजपची मानसिकता दिसते. जिल्हा निर्मितीचे राजकीय फायदे हे दूरगामी परिणाम करणारे असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. नवीन जिल्हा निर्मितीसंदर्भात नियुक्त समितीने त्यांचा अहवाल दिला आहे. आता जिल्हा निर्मितीसंदर्भात नवीन निकष आणि संभाव्य खर्च यासंदर्भात माहिती घेण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने अद्याप त्यांचा अहवाल राज्य शासनास दिला की नाही, ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही. यासंदर्भात ही समिती आता काय सुचवते, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. त्यातच राज्याचे मुख्य सचिव असलेले सुमित मलिक हे सेवानिवृत्त होत असल्याने नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसंदर्भातील निकष काय राहतील, ही बाबही स्पष्ट होऊ शकलेली नाही.

तर लगतच्या तालुक्यांचा समावेश?
जिल्हा निर्मितीच्या निकषामध्ये मुख्यालयापासून किमान ५० ते ५५ किमी अंतरापर्यंतच्या गावांचा प्रामुख्याने संबंधित जिल्ह्यात समावेश केल्या जातो. त्यादृष्टीने घाटाखालील तालुके सोयीचे ठरत आहेत. संग्रामपूर तालुक्यातील एक गाव हे फक्त सर्वाधिक दूर असून, ते जवळपास ५० किमी अंतरावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातच जिल्हा परिषद निर्मितीसाठी किमान ५० सदस्य संख्या असणे क्रमप्राप्त आहे. त्यादृष्टीने खामगावलगतच्या एखाद्या जिल्ह्यातील तालुका किंवा खामगाव तालुक्याचेच विभाजन करून लाखनवाडा तालुका निर्मिती केली जाऊ शकतो. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याची निर्मिती झाली, तेव्हा परभणी जिल्ह्यातील परतूर तालुका हा जालना जिल्ह्याला जोडल्या गेला होता. असे असले तरी तूर्तास या केवळ शक्यता आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात खामगाव जिल्हा होणार की नाही, याबाबत तुर्तास तरी साशंकता व्यक्त होत आहे.

खामगाव जिल्हा निर्मितीसंदर्भात अद्याप प्रशासकीय पातळीवर काही हालचाल नाही. दोन वर्षांपासून यासंदर्भात कुठलाही पत्रव्यवहार नसून, त्यादृष्टीने आम्हाला अद्याप कुठलेही पत्र मिळालेले नाही.
- ललित वºहाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा.

Web Title: no expectation to build Khamgaon disrict in this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.