अग्रिम कर्जासाठी एकही शेतकरी पात्र नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:41 AM2017-08-05T00:41:24+5:302017-08-05T00:44:42+5:30
रुईखेड मायंबा : शासनाने शेतकर्यांना कर्ज माफ केले असून, दहा हजार रुपये अग्रिम देण्याची घोषणा केली आहे. परंतु, यात चांडोळ परिसरातील एकही शेतकरी पात्र नसल्याचा खुलासा महाराष्ट्र बँक शाखा चांडोळने केला. त्यामुळे परिसरातील एकाही शेतकर्याला अग्रिम दहा हजार रुपये मिळाले नाहीत.
बबन फेपाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रुईखेड मायंबा : शासनाने शेतकर्यांना कर्ज माफ केले असून, दहा हजार रुपये अग्रिम देण्याची घोषणा केली आहे. परंतु, यात चांडोळ परिसरातील एकही शेतकरी पात्र नसल्याचा खुलासा महाराष्ट्र बँक शाखा चांडोळने केला. त्यामुळे परिसरातील एकाही शेतकर्याला अग्रिम दहा हजार रुपये मिळाले नाहीत.
शासनाने अल्पभूधारक सर्व शेतकर्यांचे दीड लाखांच्या आत कर्ज माफ केले. तशाप्रकारची घोषणा मंत्र्यांनी केली. तसेच पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्यांचाही आता कर्जमाफीत समावेश करण्यात आला आहे. २00९ पासून तर २0१६ पर्यंत थकीत असलेले कर्ज शासनाने माफ केले आहे. त्यानुसार परिसरातील सर्व शेतकरी शासनाच्या निकषात बसतात. तसेच शेतकर्यांना खरिपाच्या पेरणीसाठी मदत म्हणून अग्रिम १0 हजारांची मदत जाहीर केली.
त्यानुसार चांडोळ परिसरातील कुलमखेड, माेंढाळा, सातगाव म्ह., म्हसला बु., म्हसला खु., ईरला, चांडोळ, रुईखेड मां., मोहोज, भडगाव, ढंगारपूर, जांब आदी गावांतील एकूण ३00 शेतकर्यांनी रीतसर अर्ज भरून शेतीची महत्त्वाची कामे असताना दिवसभर बँकेत रांगा लावून अर्ज भरून दिले. एका अर्जासाठी कमीत कमी ३00 रुपयांपर्यत खर्च झाला. सध्या शेतात कामे सुरू असून, शेतकर्यांना २00 ते ३00 रुपये रोज मिळत आहे. सदर मजुरीला न जाता शेतकरी बँकेत उभे राहिले. त्यानंतर शेतकर्यांच्या नशिबी मात्र उपेक्षाच आली.
त्यावर तुमचे बँक खाते एनपीएमध्ये गेल्याने अग्रिम मंजूर करता येणार नसल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले. त्यामुळे स्वत: जवळ पैसे असते, तर खाते एनपीएमध्ये गेलेच कशाला असते, अशी शेतकर्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकर्यांची होत असलेली हेळसांड थांबविण्याची मागणी परिसरातून होत आहे.
२१ महिन्यांपेक्षा जास्त काळ खाते थकल्यामुळे ते एनपीएमध्ये जाते. त्यामुळे अग्रिमसाठी अर्ज केलेल्या शेतकर्यांच्या बँक खात्यात अग्रिम जमा करता येणार नाही.
- चंद्रशेखर पाठराबे
व्यवस्थापक, महाराष्ट्र बँक चांडोळ