नुकसान भरपाईपासून कोणीही वंचित राहू नये-सत्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:56+5:302021-09-16T04:42:56+5:30

१४ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुषंगीक विषयासह संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची नेमकी ...

No one should be deprived of compensation | नुकसान भरपाईपासून कोणीही वंचित राहू नये-सत्तार

नुकसान भरपाईपासून कोणीही वंचित राहू नये-सत्तार

Next

१४ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुषंगीक विषयासह संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची नेमकी पूर्वतयारी काय आहे? या मुद्द्यावर त्यांनी सविस्तर आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि. प. सीईओ भाग्यश्री विसपुते प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना व पशुमालकांना तातडीने आर्थिक मदतीचे वाटप करावे. पावसामुळे नुकसान झालेला शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे पूर्ण करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणांनी सतर्क रहावे. ऑक्सिनज निर्मिती, साठा व पुरवठा याला प्राधान्य दिले जावे. जिल्ह्यात दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढविण्यास प्राधान्य द्यावे. लसीकरण मोहिमेचा ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी एखादा तालुका लक्ष्य करून युद्धपातलीवर लसीकरण मोहीम राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. लसीकरणाबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. सोबतच ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याच्या मोहिमेचा वेग वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिली. या वेळी खा. प्रतापराव जाधव, आ. रायमलुकर, आ. संजय गायकवाड यांनीही नुकसानासंदर्भात माहिती सर्वेक्षण गांभीर्यपूर्वक करावे, अशा सूचना दिल्या.

या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन तडस, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

--अतिक्रमण, अरुंद नदीपात्रामुळे नुकसान--

बुलडाणा, मोताळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान हे नदीपात्रातील अतिक्रमण, पात्र अरुंद असणे तथा प्रवाहात मानवनिर्मित अडथळ्यामुळे झाले आहे. त्यासंदर्भाने नद्यांचा डीपीआर बनवून यातील अडचणी दूर केल्यास नुकसानीचे प्रमाण कायमस्वरुपी कमी करण्यास मदत होईल. त्यादृष्टीने यंत्रणांनी काम करावे, असेही महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या पारदर्शक पद्धतीमुळे मोजणीतील अनेक त्रुटी दूर करण्यात येणार आहे. त्यावरून मिळकत पत्रिका तयार होणार आहे. ही नागरिकांना भविष्यात सुविधा देणारी पद्धत आहे. त्यामुळे ड्रोन सर्व्हेचे काम गतीने पूर्ण करावे.

Web Title: No one should be deprived of compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.