बुलडाणा जिल्ह्यातील ‘टीईटी’ नसलेल्या शिक्षकांचे वेतन बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 03:02 PM2020-02-09T15:02:53+5:302020-02-09T15:02:58+5:30
टीईटी नसलेल्या शिक्षकांचे १ जानेवारी २०२० पासून वेतन थांबविण्याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: प्राथमिक शिक्षकांकरीता (इयत्ता पहिली ते आठवी) शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक आहे. १३ फेबु्रवारी २०१३ ते ६ फेब्रुवारी २०१९ पर्यंतच्या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील टीईटी नसलेल्या शिक्षकांचे १ जानेवारी २०२० पासून वेतन थांबविण्याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यामुळे टीईटी नसलेले शिक्षक संकटात सापडले आहेत.
प्राथमिक शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी वेळोवळी शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यात आले. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर ६ फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या अनुदानित, विनाअनुदानित यासह सर्व माध्यमाच्या शाळांवरील प्राथमिक शिक्षकांना टीईटी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. अशा शिक्षकांसाठी तीन वेळा टीईटीची संधी देण्यात आली होती. परंतू या तीनही वेळा परीक्षेची काठीण्य पातळी वाढविण्यात आल्याने अनेक शिक्षक टीईटी उत्तीर्ण होऊ शकले नसल्याची आरोड शिक्षकांमधून होत आहे. आता तर १ जानेवारी २०२० पासून जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेशच देण्यात आले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना दिलेल्या पत्रामध्ये टीईटी नसलेल्या शिक्षकांचे देयक न काढण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आठ ते दहा वर्षापासून बिनपगारावर काम करणाºया शिक्षकांनाही आता घरी बसण्याची वेळ आली आहे. राज्यातील १५ हजार शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. त्यात १०० टक्के अनुदानातील आठ हजार शिक्षक आहेत.
जिल्ह्यात शंभरावर शिक्षक
२०१३ नंतर नियुक्त झालेल्या व टीईटी नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही आता सुरू झाली आहे. जिल्ह्यात खाजगी शिक्षण संस्थामधील अनुदानित व विनाअनुदानित शाळेवरील टीईटी नसलेल्या शिक्षकांची संख्या १०० पर्यंत आहे. तर माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत टीईटी अनुतिर्ण असलेले २९ शिक्षक आहेत. त्यामध्ये अमरावती विभागामध्ये सुमारे ४०० च्या आसपास ही शिक्षक संख्या आहे.
शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होण्याबाबतचे निर्णय अनेकवेळा घेतले. काही वेळा ते निर्णय रद्दही करण्यात आले. तरीसूद्धा या कार्यकाळामध्ये शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या नवीन नियुक्त्या थांबविण्यात आल्या नाहीत. शिक्षक पात्रता परीक्षेला आमचा विरोध नाही. परंतू जे-जे शिक्षक सेवेत रूजू आहेत, त्यांना टीईटी उत्तीर्ण करण्याच्या जाचक अटीमधून तात्काळ मुक्तता देण्यात यावी. त्यांचे आज कुटुंब रस्त्यावर आले आहे.
- सुरेश धामणे, कार्याध्यक्ष,
टीईटी संघर्ष समिती, नागपूर.
२०१३ नंतर नियुक्त झालेले व टीईटी नसलेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्या संदर्भात मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाºयांना पत्र पाठविण्यात आले आहे. खाजगी शिक्षण संस्थातील अनुदानित व विनाअनुदानित कर्मचाºयांची सेवा समाप्तीची कार्यवाही संबंधित शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर करावी. टीईटी नसलेल्या शिक्षकांची सेवा संबंधित शैक्षणिक संस्थांनी यापुढे सुरू ठेवल्यास शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
- एजाजुल खान, शिक्षणाधिकारी.