बचत खात्यातील रक्कम मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:48+5:302021-07-01T04:23:48+5:30
साखरखेर्डा : येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत मुलीच्या लग्नासाठी फिक्स डिपाॅझिट केलेले पैसे मिळत नसल्याने महिला खातेदार त्रस्त झाली ...
साखरखेर्डा : येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत मुलीच्या लग्नासाठी फिक्स डिपाॅझिट केलेले पैसे मिळत नसल्याने महिला खातेदार त्रस्त झाली आहे़ महिलेचे खातेच बँक व्यवस्थापकाला न सापडल्याने त्या महिलेला मुलीचे लग्न उसनवारी करून करावे लागले आहे. शाखा व्यवस्थापकांनी त्या खात्याचा त्वरित शोध घेऊन फिक्स डिपाॅझिटची रक्कम द्यावी, अशी मागणी सरपंच अलका भानुदास लव्हाळे यांनी केली आहे.
राताळी येथील मीना बळीराम सोभागे या महिलेने २००३ साली मुलीच्या नावे फिक्स डिपाॅझिट म्हणून काही रक्कम टाकली होती. मुलगी लग्नाला आली, १८ वर्षे वयही पूर्ण झाले. सदर महिला पासबुक घेऊन बँकेत गेली असता तुमचे खाते सापडत नाही, उद्या या, परवा या, असे करता करता महिना लोटला. मुलीच्या लग्नासाठी उसनवारी करून पैसे जमा केले. मुलीचे लग्नही झाले; परंतु बँकेला त्या महिलेच्या खात्याचा शोध लागला नाही. सदर महिलेने मुलीच्या लग्नासाठी फिक्स योजनेत जमा केलेल्या पैशाचा शोध लावून त्या महिलेला न्याय द्यावा, अशी मागणी सरपंच अलका भानुदास लव्हाळे यांनी केली असून पैसे न दिल्यास ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.