नोटाबंदीचा पेरणीला लगाम!
By admin | Published: November 18, 2016 02:44 AM2016-11-18T02:44:57+5:302016-11-18T02:44:57+5:30
बुलडाणा जिल्ह्यात दहा दिवसात १६ टक्केच पेरणी.
विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. १७-ऐन रब्बी हंगामातील पेरणीच्यावेळी नोटा बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकर्यांकडे बियाणे, खते व विविध साहित्य खरेदी करण्यासाठी पैसेच नसल्याने रब्बी हंगामातील पेरणीही प्रभावित झाली आहे. जिल्हय़ात ७ नोव्हेंबरपर्यंंत ४0 टक्के पेरणी झाली होती. यामध्ये अधिक गती येणे आवश्यक असतानाच ५६ टक्के पेरणी झाली आहे.
दहा दिवसांपूर्वी शासनाने ५00 व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे याचा परिणाम सर्वच स्तरावर पडला आहे. या निर्णयामुळे कृषी क्षेत्रातील बहुतांश व्यवहार ठप्प पडले आहेत. वर्हाडात दिवाळीनंतर रब्बी हंगामाला सुरुवात होते. नोव्हेंबर महिन्यात शेतकरी गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका यासह रब्बी पिकांची पेरणी करतात. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी ५00 व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. तर बँकेतून केवळ चार हजार रुपयेच बदलून घेण्याची मुभा दिली. त्यामुळे शेतकर्यांकडे बियाणे, खत खरेदीसाठी तसेच मजुरांना पेरणीचे पैसे देण्यासाठी पैसेच नाहीत. परिणामी शेतकर्यांनी पेरणी पुढे ढकलली आहे. शासनाने नोटा बंदीचा निर्णय घेईपर्यंंत जिल्हय़ात ४0 टक्के पेरणी झाली होती. त्यानंतर दहा दिवसात पेरणी मोठय़ा प्रमाणात वाढणे अपेक्षित होते. मात्र, गत दहा दिवसात केवळ १६ टक्के पेरणी झाली. १६ नोव्हेंबरपर्यंंत जिल्हय़ात ५६ टक्के पेरणी झाली आहे.
जिल्हय़ात एकूण रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १,३४,३९५ हेक्टर आहे तर ७ नोव्हेंबरपर्यंंत ४0 टक्के म्हणजे ५४,८0३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. तर गत दहा दिवसात यामध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली असून, एकूण हेक्टरवर पेरणी झाली आहे.
बाजार समिती बंदचा फटका
शेतकरी खरीप हंगामातील पिकांची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशातून रब्बीची पेरणी करण्याकरिता बियाणे व खत खरेदी करतात; मात्र यावर्षी गत दहा दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकर्यांनी खरीप हंगामातील सोयाबीनसह अन्य शेतमालाची विक्री केलीच नाही. त्यामुळे शेतकर्यांकडे रब्बी हंगामात पेरणी करण्याकरिता पैसेच नाहीत.
हरभरा व गव्हाची पेरणी अधिक
जिल्हय़ात रब्बी हंगामात हरभरा व गव्हाची मोठय़ा प्रमाणात पेरणी करण्यात येते. यावर्षी आतापर्यंंंत १0,१९१ हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली तर ५३,६५४ हेक्टरवर हरभर्याची पेरणी करण्यात आली आहे.
गत दहा दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. तसेच बाजारपेठेत पैसेच नाहीत. बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. उधार देण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी सध्या स्थगित ठेवली आहे. बँकेतून मुबलक पैसे मिळाल्यावर रब्बीच्या पेरणीला प्रारंभ करू.
- प्रदीप पवार, शेतकरी, अजिजपूर