बहूमताअभावी सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:29 PM2017-10-24T13:29:04+5:302017-10-24T13:29:41+5:30
सिंदखेडराजा : गोरेगाव येथील सरपंच सौ.सिमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदार यांच्या समक्ष तहसिल कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहूमता अभावी अविश्वास ठराव रद्द करण्यात आला. असा निर्णय प्रभारी तहसिलदार सारीका भगत यांनी दिला.
गोरेगाव येथे कायमस्वरुपी नळयोजना मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजूर होताच काही नागरिकांनी योजनेविरुद्ध रनकंदन उठविले होते. या योजनेचे श्रेय कोणत्याही परिस्थितीत सरपंच सौ.सिमा संजय पंचाळ यांना मिळू नये म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरुपाचे आरोप करुन १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदार संतोष कणसे यांच्या कार्यालयात उपसरपंच रहिमखा शेरखा पठाण, गिताबाई संतोष गवई, गौतम कोंडूबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्यक्ष हजर राहून अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या ठरावावर चर्चा करण्यासाठी आणि प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी २३ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत गोरेगाव येथे प्रभारी तहसिलदार सारीका भगत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला गौतम कोंडूबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ हे चारच सदस्य हजर होते. या चार सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. ग्राम पंचायत मुंबई अधिनियम १९५८ कलम उपमध्ये नमुद केल्यानुसार सर्वसाधारण सरपंच पदाकरीता अविश्वास दाखल करण्याकरीता २/३ पेक्षा कमी नसेल तरच बहूमताने ठराव पारित होवू शकतो. सरपंचावरील अविश्वास ठराव पारित करण्यासाठी सात पैकी पाच सदस्यांनी पाठींबा देणे आवश्यक होते. परंतु आज चार सदस्यांनी अविश्वास ठरावाला पाठींबा दर्शविल्याने बहुमताने असा ठराव संमत होत नाही. त्यामुळे सरपंच सौ.सिमा संजय पंचाळ यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय प्रभारी तहसिलदार सारीका भगत यांनी दिला. अविश्वास ठराव मतदानाच्या वेळी पटवारी मांडगे, ग्रामसेवक मनोज मोरे यांनी सहकार्य केले. तर ठाणेदार सचिन शिंदे, पोहेकॉ गणेश डोईफोडे यांचेसह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)