चिखली बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:16+5:302021-08-01T04:32:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : येथील बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये माजी आमदार राहुल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : येथील बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे निकटवर्तीय नंदकिशोर सवडतकर यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड झाली आहे. तर प्रशासक मंडळात १८ जणांचा समावेश असून या सर्व अशासकीय व्यक्तींच्या पात्रतेतेची शहानिशा करून नियुक्ती करावी, असे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यसन अधिकारी जयंत भोईर यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिली आहेत.
नवनियुक्त अशासकीय प्रशासक मंडळात सवडतकर हे मुख्य प्रशासक राहणार आहेत, तर प्रशासक म्हणून शिवराज विठ्ठलराव पाटील, संतोष रमेश वानखेडे, गजानन त्र्यंबक परिहार, शे. आरीफ शे. महेबूब, अॅड. मनमोहन भास्कर घेवंदे, संजय किसनराव खेडेकर, गजानन प्रल्हाद परिहार, परमेश्वर ऊर्फ बाळासाहेब सखाराम पवार, सतीश व्यंकटराव बाहेकर, दीपक संतोषराव म्हस्के, नितीन रंगनाथ इंगळे, श्रीकिसन तेजराव धोंडगे, विलास नारायणसिंग सुरडकर, रामकृष्ण कोंडुबा अंभोरे, रवींद्र उत्तमराव भगत, प्रवीण डिगांबर वराडे, राजेंद्र सुरेशराव पाटील या १८ जणांचा समावेश आहे. त्यांच्या पात्रतेची शहानिशा करून अशासकीय प्रशासक मंडलात त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
वर्षभरात संगीतखुर्चीचा खेळ !
चिखली बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २५ जून २०२० रोजी संपुष्टात आल्यानंतर सहायक निबंधक गितेशचंद्र साबळे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र, याविरोधात तत्कालीन सभापती ज्ञानेश्वर सुरुशे यांनी पणन विभागाकडे अपील दाखल करून प्रशासक नेमणुकीला स्थगिती मिळविली होती. त्यामुळे समितीच्या संचालक मंडळाकडे पूर्ववत पद्भार सोपविण्यात आला होता. दरम्यान संचालक मंडळाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यानंतर पुन्हा ३ फेब्रुवारी रोजी बाजार समितीवर प्रशासक म्हणून साबळे यांची नियुक्ती झाली. दरम्यान आता वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतर समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाच्या नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत.