बुलडाणा जिल्ह्यात वर्गच नव्हे, मुलांचे स्वागतही होणार ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 12:01 PM2021-06-28T12:01:22+5:302021-06-28T12:01:50+5:30
Education Sector News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळेतील वर्गच नव्हे, तर मुलांचे पहिल्या दिवशी स्वागतही ऑनलाइन होणार आहे.
- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शाळेचा पहिला दिवस म्हणजे मुलांसोबतच त्या शिक्षकांसाठीही न विसरणारा असतो. परंतू कोरोनामुळे शाळेचा पहिला दिवस केवळ आठवणी राहिल्याची खंत काही शिक्षकांनी लोकमतकडे शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळेतील वर्गच नव्हे, तर मुलांचे पहिल्या दिवशी स्वागतही ऑनलाइन होणार आहे. घंटा ऐवजी मोबाईलची रिंग वाजणार आहे. जिल्ह्यात २८ जूनपासून जिल्हा परिषदसह नगर पालिका, अनुदानित, विनाअनुदानीत व सर्व माध्यमांच्या शाळा सुरू होत आहेत. परंतू कोरोना विषाणू संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही शाळा ऑनलाइनच राहणार आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी होणारा शाळेतील किलबिलाट ऐकायला मिळणार नाही. मुलांचा शाळा प्रवेशोत्सव व त्यांचे स्वागतही ऑनलाइनच होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात सहभागी होता यावे, यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रयत्न केल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
असा राहणार पहिला दिवस
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळेच्या पहिल्या दिवशी वेगवेगळ्या शाळेला भेटी देऊन मुलांचे स्वागत करणे, त्यांना नवीन गणवेश, पुस्तके भेट देणे असा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. मात्र यंदा ऑनलाइन शाळेने यात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे त्यांच्या टिमसह शाळेच्या पहिल्या दिवशी जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल गाव असलेल्या चारबन येथील जिल्हा परिषद शाळेत जाणार आहेत. त्यानंतर जवळपास ९० विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा ऑनलाइन वर्ग भरविण्यात येणार आहे. ज्यामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाइन वर्गात पालकांचाही सहभाग राहणार आहे. यावेळी मुलांचे ऑनलाइन स्वागत करण्यात येणार आहे.