फक्त पैसेच नाही तर परस्पर लोनही मंजुर करुन केले ट्रान्सफर, शिक्षकाची आठ लाखांची फसवणूक
By भगवान वानखेडे | Published: March 19, 2023 05:38 PM2023-03-19T17:38:35+5:302023-03-19T17:38:56+5:30
चिखलीतील सागर भिमराव पैठणे (४१) हे भालगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणुन कार्यरत आहे.
बुलढाणा : स्टेट बॅंकेचे योनो मनी ट्रान्सफर ॲप अपडेट करण्याच्या नावाखाली एका सायबर भामट्याने चिखलीतील शिक्षकाच्या खात्यातून २० हजार रुपये ट्रान्सफर केले. यावरच सायबर भामटा न थांबता त्याने स्वत:चा मोबाइल नंबर बॅंक खात्याला लिंक करुन तब्बल ८ लाख रुपयांचे लोन मंजुर करुन ते दुसऱ्या अकाऊंटवर ट्रान्सफर केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिक्षकांने दिलेल्या तक्रावरुन सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखलीतील सागर भिमराव पैठणे (४१) हे भालगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणुन कार्यरत आहे. त्यांचे पगारीचे बॅंक खाते स्टेट बॅंकेत असून, मनी ट्रान्सफरींगसाठी ते एसबीआयचे योने लाईट हे मनी ट्रान्सफर ॲप वापरतात. दरम्यान ११ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान त्यांना अज्ञाताने फोन करुन ‘मै एसबीआय ब्रॅंचसे बात कर रहा हूॅं, आपका योनो ॲप अपडेट करना होगा’ त्यासाठी त्यांने व्हाटसॲपवर एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करताच पैठणे यांच्या मोबाइलमधअये योनो लाईट आणि सपोर्ट असे दोन ॲप ओपन झाले. त्यानंतर एटीएमचे शेवटचे क्रमांक टाकण्यास सांगितले. त्यानंतर ओटीपी येताच त्याने पैठणे यांना तो ओटीपी ॲपमध्ये भरण्यास सांगितले.
दुसऱ्या दिवशी आला पैसे काढून घेतल्याचा मॅसेज
१२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सुमारास पैठणे यांच्या मोबाइलवर एकवेळा १५ हजार ४३३ रुपये आणि दुसऱ्यावेळी ५०० रुपये कटल्याचा मॅसेज आला. याबाबत बॅंकेत जाऊन चौकशी केली असता कुणी अज्ञाताने फसवणूक केल्याचे उघड झाले.
आठ लाख रुपयांचे पर्सनल लोन मंजुर करुन केले ट्रान्सफर
सागर पैठणे यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद आहे की, त्या सायबर भामट्याने पैठणे यांच्या बॅंक खात्याला स्वत:चा मोबाइल नंबर लिंक करुन पैठणे यांच्या नावावर आठ लाख रुपयांचे लोन मंजुर करुन ते दुसऱ्या बॅंक खात्यावर ट्रान्सफर केले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.