आरोग्य निरिक्षकांसह २५ जणांना नोटीस; ३६०० रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 05:22 PM2018-11-24T17:22:26+5:302018-11-24T17:23:55+5:30
पालिकेच्या आरोग्य निरिक्षकांसह २५ जणांना नोटीस बजावली असून, उघड्यावर कचरा टाकणाºया १८ जणांकडून ३६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : उघड्यावरील कचरा साफ केल्यानंतर जाळणाºया विरोधात पालिकेने दंडात्मक पावले उचलली आहेत. उघड्यावर कचरा जाळल्याप्रकरणी पालिकेच्या आरोग्य निरिक्षकांसह २५ जणांना नोटीस बजावली असून, उघड्यावर कचरा टाकणाºया १८ जणांकडून ३६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या दंडात्मक कारवाईमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे.
उघड्यावर कचरा जाळणे दंडात्मक अपराध असतानाही, खामगावात उघड्यावर सर्रास कचरा जाळण्याचे प्रकार वाढीस लागले होते. सामान्य नागरिकांसोबतच पालिकेच्या जबाबदार कर्मचाºयांकडूनही सामान्य कचºयासोबतच प्लास्टिक कचरा पेटविल्या जात असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये पालिकेच्या मैदानावर आरोग्य निरिक्षकांच्या उपस्थितीत कचरा जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या पालिका प्रशासनाकडून उघड्यावर कचरा जाळल्याप्रकरणी आरोग्य निरिक्षकांसह शहरातील सर्वच वार्डातील वार्ड प्यून यांना नोटीस बजावली आहे.
२५ जणांना आरोग्य विभागाची नोटीस
उघड्यावरील साफ केलेला कचरा जाळल्यास यापुढे दंडात्मक कारवाईचा इशारा एका नोटीसद्वारे देण्यात आला आहे. यामध्ये दोन स्वच्छता निरिक्षकांसह २३ वार्ड प्यूनचा समावेश आहे.मात्र, प्लास्टिक कचरा पेटविल्याप्रकरणी पालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.
उघड्यावर कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई
स्वच्छ भारत अभियानातंर्गत विविध नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये उघड्यावर कचरा टाकणाºया विरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. १ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरच्या कालावधीत पालिका प्रशासनाकडून १८ जणांवर उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ३६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.