उडीद खरेदी घोटाळ्य़ात ३२ जणांना नोटीस; बुलडाणा तालुक्यातही घोटाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:29 AM2018-02-08T00:29:13+5:302018-02-08T00:29:43+5:30
बुलडाणा : चिखली तालुक्याप्रमाणे बुलडाणा तालुक्यातही उडीद खरेदी घोटाळा झाल्याचे समोर येत असून सहकार विभागाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत बुलडाण्यातही या घोटाळ्य़ाची चौकशी सुरू झाली आहे. त्यांतर्गत तब्बल ३२ जणांना बुलडाणा तालुका उपनिबंधकांनी नोटीस बजावल्या असून, ९ फेब्रुवारीला या प्रकरणात सुनावणी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : चिखली तालुक्याप्रमाणे बुलडाणा तालुक्यातही उडीद खरेदी घोटाळा झाल्याचे समोर येत असून सहकार विभागाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत बुलडाण्यातही या घोटाळ्य़ाची चौकशी सुरू झाली आहे. त्यांतर्गत तब्बल ३२ जणांना बुलडाणा तालुका उपनिबंधकांनी नोटीस बजावल्या असून, ९ फेब्रुवारीला या प्रकरणात सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे याच प्रकरणात प्रारंभी नोटीस बजावलेल्या तीन जणांची चौकशी समितीने केली आहे. प्रसंगी या प्रकरणात लवकरच पोलिसांत गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा विशेष लेखा परीक्षक दीपक जाधव आणि बुलडाण्याचे सहायक निबंधक अविनाश सांगळे यांच्या त्रिसदस्यीय समितीमार्फत सध्या या प्रकरणाची चौकशी होत आहे.
उडीद उत्पादक शेतकर्यांची लूट करत नाफेडच्या अधिकार्यांना हाताशी धरून काही व्यापार्यांनी बनावट शेतकरी दाखवत उडीद खरेदीत लाखो रुपयांचा घोटाळा केल्याची शक्यता आहे. तसे आरोपही असून, यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारीही झाल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी ही तीन सदस्यीय समिती नियुक्त केली होती. चिखली तालुक्या पाठोपाठ बुलडाणा तालुक्यातही असा घोटाळा झाला असल्याची चर्चा आता असून, त्यानुषंगानेच ही नोटीस ३२ जणांना सध्या बजावण्यात आली आहे. प्रारंभीचे तीन मिळून एकूण ३५ जणांना ही नोटीस बजावली गेली आहे. आणखी काही जणांना प्रकरणात नोटीस बजावल्या जाण्याची शक्यता आहे.बुधवारी या प्रकरणात तिघांची चौकशी झाली असून, उर्वरित ३२ जणांची आता ९ फेब्रुवारीला चौकशी होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात बाजार समित्यांनाही प्रारंभी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. बीजोत्पादक कंपन्यांकडूनही प्रकरणात माहिती मागविण्यात आली होती. उडीद खरेदीदरम्यान उत्पादीत उडीद आणि प्रत्यक्ष खरेदी केलेला उडीद यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यानंतर हे प्रकरण प्रकर्षाने समोर आले आहे.