कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:42 AM2021-03-17T11:42:11+5:302021-03-17T11:42:21+5:30
Notice of confiscation मालमत्ता कर न भरणाऱ्या २९० मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाईची मोहीम उघडल्यानंतर नगर पालिका प्रशासनाने आता मालमत्ता कर न भरणाऱ्या २९० मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत. पालिकेने १०५ बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, कारवाईचे पुढचे पाऊल म्हणून मोठ्या आणि कर वसुलीत सहकार्य न करणाऱ्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत पालिका प्रशासन आणि थकबाकीदारांमध्ये ‘संघर्ष’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मार्च महिन्यात शंभर टक्के कर वसुलीचे आदेश नगर विकास विभागाने काढले आहेत. या पार्श्वभूमीवर खामगाव नगर पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली असून, या कारवाईचा एक भाग म्हणून थकबाकीदारांच्या याद्या चौका-चौकात प्रसिद्धीसाठी तयार केल्या आहेत. दरम्यान, या मोठ्या थकबाकीदारांना सूचना वजा नोटीस बजावण्यात आल्या. या सूचनेकडे कानाडोळा करणाऱ्या २९० थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीसाठी सक्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
खामगाव शहरात मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर विविध स्वरूपांच्या करापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मालमत्ता कराची सर्वात जास्त थकबाकी आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाकडून वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या कारवाईकडे कानाडोळा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये मालमत्ता जप्ती सोबतच नळ कनेक्शनही कापण्यात येणार आहे. सोबतच इतरही दंडात्मक कारवाई आणि नामुष्कीसाठी तयार रहावे लागणार असल्याचे सूतोवाच पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.