डम्पिंग ग्राउंड आगप्रकरणी आरोग्य विभागाला नोटीस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:05 PM2021-02-27T12:05:56+5:302021-02-27T12:06:51+5:30
Khamgaon News कचऱ्याला आग लागल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला नोटीस बजावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला आग लागल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला लागली होती. ही आग विझवण्यासाठी आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष झाले. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. कचऱ्याचा धूर निम्म्या शहरात पसरला. त्यामुळे ऐन कोरोनाकाळात शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याप्रकरणी गंभीर दखल घेत मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांनी आरोग्य विभागाला नोटीस बजावली आहे. यामध्ये स्वच्छता पर्यवेक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांचा समावेश आहे. २४ तासांच्या आत त्यांनी संबंधितांना खुलासा मागितला आहे.
डम्पिंग ग्राउंडवर रिचविले ५२ बंब!
डम्पिंग ग्राउंडवर लागलेली कच-याची आग विझवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून तब्बल ५२ गाड्या रिचविण्यात आल्या. यामध्ये शेगाव नगरपालिकेच्या तीन गाड्यांचाही समावेश आहे. दिवसरात्र आग विझवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
यामध्ये बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेपर्यंत १८ बंब रिचविण्यात आले. गुरुवारी दिवसभर १४ आणि शेगाव येथील तीन अशा १७ बंबांचा आगीवर मारा करण्यात आला. त्यानंतर, गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत १७ बंब असे एकूण ५२ बंब शुक्रवार दुपारपर्यंत रिचविण्यात आले.