PM Kisan scheme : शेतकऱ्यांना रक्कम वसुलीसाठी बजावल्या नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:58 PM2020-12-12T16:58:15+5:302020-12-12T16:58:27+5:30
खामगाव तालुक्यात ३४१ शेतकरी आयकर भरणारे असून, त्यांच्याकडून ३२ लाख ५० हजार रुपये वसूल करायचे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पंतप्रधान किसान योजनेचा काही शेतकऱ्यांना फायदा तर काहींना ही योजना डोकेदुखी ठरली आहे. अनेक शेतकऱ्यांना आयकर भरतात म्हणून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत, तर एकाच कुटुंबातील दोन शेतकऱ्यांना अर्थात पती-पत्नीला याचा लाभ मिळाला असेल तर एकाला नोटीस बजाविण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या योजनेनुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत राहावी, यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये अनुदान देण्यात आले. त्यातून राजकीय नेते व आयकर भरणारे शेतकऱ्यांना वगळण्यात आले. यामध्येच आयकर विभागाने जे शेतकरी किंवा व्यक्ती आयकर भरतात, त्यांची यादी केंद्र शासनाकडे पाठविली. त्यातील शेतकऱ्यांना वसुलीची नोटीस देण्यात आली आहे. खामगाव तालुक्यात ३४१ शेतकरी आयकर भरणारे असून, त्यांच्याकडून ३२ लाख ५० हजार रुपये वसूल करायचे आहेत. तर काही शेतकरी अपात्र ठरले आहेत.
तलाठ्यामार्फत नोटीस बजावणे सुरू आहे. त्यातील काहींनी रक्कमही भरली आहे. ही कार्यवाही संपूर्ण वसुलीपर्यंत सुरूच राहणार आहे.
- भारत किटे,
नायब तहसीलदार, खामगाव