करवसुलीसाठी ८५ मालमत्ताधारकांना नोटीस
By admin | Published: February 10, 2016 02:09 AM2016-02-10T02:09:13+5:302016-02-10T02:09:13+5:30
सक्तीच्या करवसुलीसाठी खामगाव पालिका आक्रमक.
खामगाव: नगर परिषदेने कर वसुलीसाठी धडक मोहीम उघडली असून, आतापर्यंंंत २ कोटी ५५ लाख रुपयांची कर वसुली केली आहे. तर सुमारे ४00 मालमत्ताधारकांवर जुनी थकबाकी आहे. अशा मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाईसुद्धा करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ८५ थकीत मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. खामगाव नगरपालिका प्रशासनाला सन २0१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ८ कोटी, ५५ लक्ष, ७१ हजार २४३ रुपयांचे एकूण उद्दिष्ट आहे. यामध्ये सन १४-१५ चे थकीत असलेले ३ कोटी ४३ लक्ष रुपये आणि आणि चालू आर्थिक वर्षातील ५ कोटी, १२ लक्ष, ७0 हजार २८४ रुपयांचा समावेश आहे. त्या दृष्टिकोनातून मार्च अखेरीस उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी पालिका प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. उद्दिष्टपूर्तीसाठी पालिका प्रशासनाने शहरातील तब्बल २९ हजार मालमत्ताधारकांना मागणी पत्र वितरित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागणीपत्रानुसार अपेक्षित कर न भरणार्या नागरिकांना पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. या नोटीसलाही न जुमानणार्या नागरिकांना पालिका प्रशासनाच्या वतीने मालमत्ता जप्तीच्या नोटीस दिल्या जात आहेत. यासाठी पालिकेच्या कर विभागातील कर्मचार्यांनी नुकतेच एक सर्वेक्षण पूर्ण केले असून, ३0 हजारांपेक्षा जास्त कर थकीत असलेल्या सुमारे चारशेच्या वर मालमत्ताधारकांची यादी तयार केली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ८५ मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.