‘त्या’ अधिकार्यांना नोटीस
By admin | Published: July 10, 2014 11:19 PM2014-07-10T23:19:36+5:302014-07-10T23:19:36+5:30
रजेवरील न.प.कर्मचार्यांना मागितला खुलासा
खामगाव: कार्यालयीन वेळेत गैरहजर कर्मचार्यांना तसेच दौर्यावर असलेल्या अधिकार्यांना आज गुरूवारी नगर पालिका प्रशासनाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेत अधिकारी, कर्मचारी कार्यालयात गैरहजर असल्याचे सचित्र वृत्त (स्टिंग ऑपरेशन) लोकमतने गुरूवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते, हे येथे उल्लेखनिय!
नगराध्यक्ष, उपाध्यक्षांच्या जागी प्रशासकांनी पदभार घेतल्यानंतर नगर पालिकेचा कारभार चांगलाच ढेपाळल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशीत होताच, नगर प्रशासन विभाग खळबळून जागे झाले. मुख्याधिकारी डी.ई. नामवाड यांनी आज सर्व विभाग प्रमुखांना कुठे दौर्यावर असल्याबाबत तसेच कार्यालयातील रजेवर असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांबाबत लेखी खुलासा मागीतला आहे.
बुधवारी नगर पालिका कार्यालयातील विविध विभागाच्या प्रमुखांसह अनेक विभागातील कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले होते. शिक्षण आणि कर विभाग वगळता अन्य विभाग सामसूम होते. वरिष्ठ अधिकार्यांच्या अनुपस्थितीत बुधवारी नगर पालिकेतील कारभार चांगलाच ढेपाळल्याचे चित्र होते. तथापि, आता प्रशासनाने दांडी बहाद्दर कर्मचार्यांना वठणीवर आणण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.