आता विधानसभेसाठी इच्छुकांचा काथ्याकुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 03:31 PM2019-05-25T15:31:57+5:302019-05-25T15:32:22+5:30
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीची उत्तरार्धाची कहानी निकालानंतर सफळ संपूर्ण झाली असली तरी आता १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी काथ्याकुट सुरू झाली आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीची उत्तरार्धाची कहानी निकालानंतर सफळ संपूर्ण झाली असली तरी आता १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी काथ्याकुट सुरू झाली आहे. अवघ्या तीन महिन्यावर विधानसभा निवडणूक आली असताना विधानसभा निहाय मिळणार्या मताधिक्याच्या आधारावर सातही विधानसभा मतदार संघात सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांमधूनही या निकालाचा अन्वयार्थ काढण्याचे प्रयत्न आहेत.
बाराव्या विधानसभा निवडणुकीमध्ये (२००९) सातही विधानसभा मतदार संघातून ८५ उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले होते तर २०१४ च्या निवडणुकीत १०१ उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले होते. यंदाही हा आकडा १०० आसपास जाण्याची शक्यता आहे. आता १४ व्या विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून सातही विधानसभा मतदार संघातून इच्छूक असलेल्यांकडून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षनिहाय मिळालेली मते पाहून आपल्या राजकीय व्युव्हरचना आखण्याच्या दृष्टीने कागदावर आकडेमोड सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इच्छुकांनी आपल्या मतदार संघात कोणते पॉकेट प्रबळ व मताधिक्य देणारे ठरेल याचा अंदाज आधीच बांधलेला आहे. सातही विधानसभेतील विद्यमान आमदार गत वेळचे पराभूत उमेदवार यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान विधानसभेचे गणितही समोर ठेवले होते. निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठीचे इच्छूक कामाला लागले आहेत.
वर्तमान स्थितीत जिल्ह्यात युतीची ताकद अधिक आहे. भाजप तीन आणि सेना दोन असे पाच आमदार युतीकडे आहेत. त्या तुलनेत काँग्रेसकडे दोन आमदार आहेत. त्यामुळे ताकद तुलनेने कमी आहे. २००९ मध्ये बसपा फॅक्टर फारसा चालला नव्हता. २०१४ मध्ये मनसे फॅक्टरने शिवसेनेला बुलडाण्यात फटका दिला होता. यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन फॅक्टर कोणती सत्ता समिकरणे बिघडवतो हे बघण्यास अद्याप अवकाश आहे.
(प्रतिनिधी)
मागील निवडणुकाही चर्चेत
यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काही शब्द हे चांगलेच प्रचलित झाले होते. राजकीय वाद, सत्तासंघर्ष त्यास कारणीभूत होता. त्यातूनच बुलडाण्यात ‘दगडा पेक्षा विट मऊ’, ‘भला माणूस’, ‘पराभवसाठी कधी निवडणूक लढवली नाही’, चिखलीत ‘भाऊबंदकीचा वाद उफळा’, सिंदखेड राजात ‘अॅन्टी इनकंबन्सी’, मेहकरमध्ये ‘जागा वाटपातील सुंदोपसुंदी’ हे शब्द प्रसारमाध्यमांसह जनसामान्यांच्या तोंडीही होते. यंदा आता कोणते शब्द येतात हे बघण्यासारखे राहील.