आशियाई क्रीडा स्पर्धेत आता तिरंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष
By निलेश जोशी | Published: October 1, 2023 04:17 PM2023-10-01T16:17:32+5:302023-10-01T16:18:11+5:30
पात्रता फेरीस प्रारंभ: ७ ऑक्टोबर पर्यंत रहातील सामने
बुलढाणा: तिरंदाजीमध्ये गेल्या तीन वर्षात दमदार कामगिरी करणारे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत कशी कामगिरी करतात याकडे सध्या लक्ष लागून रहाले आहे. १ ऑक्टोबर पासून तिरंदाजांच्या पात्र फेरीस (स्कोअरिंग राऊंड) प्रारंभ झाला आहे.त्यामुळे यामध्ये हे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे सध्या लक्ष लागून रहाले आहे.
प्रथमत: पात्रताफेरीत वैयक्तिक कामगिरी उंचावण्यावर खेळाडूंचा भर रहाणार असून त्यानंतर बादफेरीचे सामने होतील. त्यामध्ये सर्वोत्तम असे आठ किंवा १६ संघ सहभागी होतील. तसेच मिक्स दुहेरीचेही सामने यात हाेणार आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा पुरुष व महिलांचा संघ २८ सप्टेंबर रोजी रवाना झाला होता. जागतिकस्तरावर सध्या १४ व्या क्रमांकावर असलेला बुलढाण्याचा प्रथमेश जवकार, अभिषेक वर्मा, अेाजस देवतळे आणि रंजन चव्हाण या खेळाडूंचा पुरुषांच्या संघात समावेश आहे तर महिलांच्या संघामध्ये आदिती स्वामी, ज्योती सुरेखा वेनम, परमीत कौर आणि अवनित कौर यांचा समावेश आहे.
या खेळाडूंनी गेल्या तीन वर्षात जागतिक पातळीवर वेगवेगळ्या स्तरावर झालेल्या स्पर्धेत बरेच उलटफेर केले होते. त्यातच बुलढाण्याच्या प्रथमेश जावकारने मे २०२३ मध्ये चीनमधील शांघाय येथेच नेदरलँडच्या माइक श्लोएसवर मात करत जागतिक तिरंदाजीत मोठा उलटफेर केला होता. त्याच्यासह दोन्ही संघातील खेळाडूंना चीनमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे चीनमधील हांगझाऊमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या या खेळाडूंकडे सध्या लक्ष लागले आहे.
२ ऑक्टोबर पासून खऱ्या अर्थाने तिरंदाजीच्या इव्हेंटमधील महत्त्वाच्या सामन्यांना सुरूवात होती. प्रारंभी दोन्ही संघाचे पहिल्या १६ मध्ये पोहोचण्याचे लक्ष्य रहाणार आहे. भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक सरजीअेा प्रागणी आणि साताऱ्याचे प्रविण सावंत हे सध्या खेळाडूंसोबत आहे. हांगझाऊ येथील वातावरणाशी हे खेळाडू कितपत जुळवून घेतात यावरही त्यांच्या यश अवलंबून आहे.
मात्र खेळाडूंच्या कुटुंबियांना या स्पर्धेमध्ये ते चांगली दमदार कामगिरी करत देशासाठी नक्कीच पदक मिळवतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय संघातील अव्वल खेळाडू प्रथमेश जावकराच्या कुटुंबियांनीही तशी अपेक्षा व्यक्त केली असली तरी स्पर्धेचे दडपण न घेता आपला नैसर्गिक खेळ प्रथमेशसह त्याचे सहकाऱ्यांनी करावा, असे स्पष्ट केले आहे.