तूर खरेदीवर आता अधिकाऱ्यांची नजर!
By admin | Published: May 15, 2017 12:31 AM2017-05-15T00:31:32+5:302017-05-15T00:31:32+5:30
नाफेड केंद्रावर गैरप्रकार : पंचनामा झालेल्या तुरीचा १५ मेपर्यंत मोजणी करण्याचा आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात नाफेड केंद्रावर कृउबास संचालकांचा हस्तक्षेप वाढत असल्यामुळे ‘कृउबास संचालकांकडे तूर विक्रीची सेटिंग’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १३ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नाफेड केंद्रावर तूर खरेदीमध्ये गैरप्रकार होऊ नये, म्हणून बुलडाणा येथील तहसीलदारांनी पंचनामा झालेल्या तुरीची १५ मेपर्यंत मोजणी करण्याचा आदेश देऊन नाफेड केंद्रावर नजर ठेवण्यासाठी पुरवठा निरीक्षक व तालाठ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर तूर खरेदीमध्ये गैरप्रकार वाढले असून, अनेक केंद्रांवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचाही हस्तक्षेप वाढला आहे. यामुळे नाफेड केंद्रावर तूर विक्रीसाठी दोन महिन्यांपासून नंबर लावून बसलेल्या शेतकऱ्यांची तूर अद्यापही विकल्या गेली नाही; मात्र कृउबास संचालकांच्या नातेवाईक शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची तूर लगेच विक्री होते. नाफेड केंद्रावर चालू असलेले गौडबंगाल ‘लोकमत’ने ‘कृउबास संचालकांकडे तूर विक्रीची सेटिंग’ या मथळ्याखाली १३ मे रोजी वृत्त प्रकाशित करून समोर आणला. यामुळे नाफेड प्रशासनासह महसूलच्या अधिकाऱ्यांनाही जाग आली. त्यानंतर दोन महिन्यांपासून तूर विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनाही नाफेड केंद्रावर सुरू असलेला गैरप्रकार समजला असता, बुलडाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ झाला होता. तेव्हा तहसीलदार सुरेश बगळे यांनी येथील केंद्रावर जाऊन पाहणी केली असता, अनेक शेतकऱ्यांची पंचनामा झालेली तूर खरेदी करणेच अद्याप बाकी असल्याचे दिसून आले. तूर खरेदी करण्यासाठी बारदाना उपलब्ध करून व शासनाने मुदत वाढवून दिलेली असतानाही पंचनामा झालेली तूर खरेदी करण्यास विलंब होत असल्याने नाफेड केंद्रावर तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या रांगा वाढतच आहेत. तेव्हा नाफेड केंद्रावर तूर खरेदीमध्ये गैरप्रकार होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी बुलडाणा येथील तहसीलदार सुरेश बगळे यांनी पंचनामा झालेल्या तुरीची १५ मेपर्यंत मोजणी करण्याचा आदेश दिला. तसेच नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची रीतसर तूर खरेदी व्हावी व गैरप्रकार करणाऱ्यांवर करडीनजर ठेवण्यासाठी पुरवठा निरीक्षक इंगळे, तलाठी शिवानंद वाघ यांची नियुक्ती केली आहे.
तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन
तहसीलदार सुरेश बगळे यांनी बुलडाणा येथील नाफेड केंद्रावर तुरीचा पंचनामा करून सदर तूर खरेदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पंचनामा झालेली तूर खरेदी लवकर व्हावी, यासाठी तीन काटे लावण्याचे आदेश दिले होते. परंतु तूर खरेदी करण्यासाठी तिसरा काटाही येथे सुरू करण्यात आला नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी अपूर्ण आहे. बुलडाणा येथील नाफेड केंद्रावर शनिवारपर्यंत तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने अनेक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
पंचनामा झालेल्याच तुरीला काट्याची प्रतीक्षा
जल्ह्यात आतापर्यंत २८९ कोटी ३६ लाख रुपये किमतीची ५ लाख ७३ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही १ लाख २ हजार तुरीच्या पोत्याची खरेदी बाकी आहे. सध्या पंचनामा झालेल्याच तुरीची खरेदी सुरू असताना बुलडाणा येथील तहसीलदारांनी पंचनामा केलेल्या तुरीची मोजणीच झालेली नव्हती. पंचनामा केल्यानंतर शनिवारला बुलडाणा बाजार समितीच्या यार्डवर ८ हजार ७५० क्विंटल तूर खरेदी करणे बाकीच होते.
पंचनामा झालेली तूर खरेदी सोमवारपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नाफेड केंद्रावर कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
- सुरेश बगळे, तहसीलदार, बुलडाणा