आता शेतकरीच करणार ई-पीक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:22+5:302021-08-13T04:39:22+5:30
मेहकर : शेतकऱ्यांना विविध लाभार्थी योजनांसाठी पारदर्शी व उपयुक्त माहिती संकलित करण्यासाठी स्वातंत्र्य दिनापासून महसूल विभागाने पीक पाहणी प्रयोग ...
मेहकर : शेतकऱ्यांना विविध लाभार्थी योजनांसाठी पारदर्शी व उपयुक्त माहिती संकलित करण्यासाठी स्वातंत्र्य दिनापासून महसूल विभागाने पीक पाहणी प्रयोग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी स्वतःचा पीक पेरा भरणार आहेत.
आजपर्यंत महसूल विभागाचे तलाठी हे प्रत्यक्ष पाहणी करूनच गाव नमुना ७ वरील बारामध्ये विविध पिकांच्या नोंदी करीत होते. या नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांना विविध कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत असे. मात्र, अनेकवेळा योग्य नोंद होत नसल्यामुळे शेतकरी अनेक योजनेपासून वंचित राहत होते. यामुळे महसूल व वन विभागाने १५ ऑगस्टपासून पीक पाहणी प्रयोग सुरू केला असून, अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून शेतकरी स्वतः स्वतःच्या शेतातील पीक पेराची माहिती देऊन नोंदणी करू शकणार आहे. यामध्ये मोबाईलवर पिकाचा फोटो काढून ॲपमध्ये टाकल्यावर या जागेचे अक्षांश आणि रेखांश तेथे दिसणार असल्याने पिकाची पारदर्शी नोंद होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, त्यांना दुसऱ्या कोणाकडून माहिती भरून घेता येईल. एका मोबाईल धारकाला जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची नोंद करता येणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची माहिती ॲपवर नोंदवणे आवश्यक राहणार आहे.
प्रयोगात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे गरजेचे
पीक पाहणी प्रयोगात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. विविध शासकीय लाभार्थी योजनेत हा पारदर्शी डाटा उठून ठरणार आहे. याकरिता ई-पीक पाहणी याची अंमलबजावणी महसूल व कृषी विभाग संयुक्तरीत्या करणार असून, शेतकऱ्यांशी समन्वय साधून समिती तयार करून पंधरा दिवसांत एक बैठक घेण्यात येणार आहे.
याबाबत अमरावती येथे विभागीय प्रशिक्षण पार पडले आहे. लवकरच स्थानिक महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतची परिपूर्ण माहिती गाव पातळीवर सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन सुरू आहे. १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना डाऊनलोड करता येईल.
डॉ. संजय गरकल, तहसीलदार, मेहकर.